पणजी - गोव्याची राजधानी पणजी येथे गेले 8 दिवस सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात 'इफ्फी'ची सांगता झाली. यानिमित्त पणजीतील श्यामप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थित चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
हेही वाचा- कुस्तीपटू बजरंग पूनिया यांना केंद्रीय क्रीडामंत्र्यांकडून खेल रत्न पुरस्कार प्रदान
केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यावेळी बोलताना म्हणाले की, इफ्फी 2020 आणि 2021 ही दोन वर्ष सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक सत्यजित रे यांना समर्पित असतील. पुढच्या वर्षीपासून सत्यजित रे यांचे शताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. त्यानिमित्त 51व्या इफ्फी समारोहात सत्यजित रे यांच्या चित्रपटांना स्थान दिले जाईल. इफ्फीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात जगभरातून चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि समीक्षक यांची मांदियाळी इथे गेले 8 दिवस जमली होती. सुमारे 76 देशांमधले 190 पेक्षा अधिक चित्रपट या महोत्सवात दाखवले गेले. त्यात 24 ऑस्कर विजेत्या चित्रपटांचा समावेश होता. ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे, असे त्यांनी सांगितले. या महोत्सवात 12 हजार प्रतिनिधी सहभागी झाले होते, हा एक विक्रमच म्हणावा लागेल, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमात भारतीय चित्रपट क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे कलावंत इल्लीयाराजा, प्रेम चोपडा, मंजू बोरा, अरविंद स्वामी आणि हनुबम पबनकुमार यांचा सत्कार करण्यात आला. गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. त्याशिवाय राजकीय आणि चित्रपट क्षेत्रातले अनेक दिग्गज मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. तसेच देशविदेशातील चित्रपट कलावंत आणि ज्युरी सदस्यही या सोहळ्याला उपस्थित होते. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता कुणाल कपूर यांनी या सांगता समारंभाचे सूत्रसंचालन केले.
इफ्फीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त फिल्म्स डिविजनने गेल्या 10 वर्षात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफच्या पुरस्कार विजेत्या 17 सिनेमांचे संकलन केले होते. हे सगळे सिनेमे इफ्फीमध्ये दाखवण्यात आले. त्याशिवाय विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नामांकन किंवा पुरस्कार मिळालेले चित्रपटही इफ्फीमध्ये दाखवण्यात आले आहेत.