पणजी - केंद्र सरकारने 25 मेपासून हवाई वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, यापूर्वीच रेल्वे वाहतूकही काही प्रमाणात सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने प्रवाशांसाठी मार्गदर्शकतत्त्वे घोषित केली आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. यावेळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे उपस्थित होते.
गोवा सरकारने बैठक बोलावून यासंदर्भात सविस्तर चर्चा करून मार्गदर्शकतत्त्वे निश्चित केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, रेल्वे, विमान, रस्ता अथवा जलमार्गाने गोव्यात येणाऱ्या प्रवाशांजवळ 48 तासांपूर्वी आयसीएमआर मान्यताप्राप्त प्रयोगशाळेकडील कोविड-19 चे नकारात्मक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रवाशाला दोन हजार रुपये भरून स्वॅब चाचणी करून घ्यावी लागेल. यासंदर्भातील आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून अर्ज भरून घेतल्यानंतरच संबंधित व्यक्तीला घरी पाठविण्यात येईल.
प्रमाणपत्र नसल्यास संबंधित व्यक्तीला होम क्वारंटाईन केले जाईल. यानंतर संबंधित व्यक्तीचा अहवाल सकारात्मक आल्यास त्याला रुग्णालयात भरती केले जाईल. तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यांना इन्स्टियूशनल पेड क्वारंटाईनमध्ये पाठवले जाईल. त्याने सर्व सूचनांचे पालन केले तर, केवळ त्या व्यक्तीलाच रुग्णालयात दाखल करून अन्य सदस्यांना होम क्वारंटाईन केले जाईल.
सोमवारपासून हवाई वाहतूक सुरू झाल्याने विविध मार्गाने गोव्यात 4 हजार प्रवासी दाखल होणार आहेत. यापूर्वी 2 हजार विमानाने तर रेल्वे आणि रस्ता मार्गाने प्रत्येकी एक हजार लोक येतील. जर त्यांच्याजवळ वैध नकारात्मक प्रमाणपत्र नसेल तर, सर्वांची चाचणी करण्याची आमची क्षमता आहे, असे डॉ. सावंत म्हणाले.
गोव्यात आतापर्यंत 13 हजार लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. तसेच कोरोनाबाधितांची संख्याही कमी आहे. परंतु, जर भविष्यात रुग्ण संख्या वाढली तर काय करता येईल, याचे नियोजन सरकारने केले आहे. राज्यातील बाधितांचा आकडा महत्त्वाचा नसून राज्य कोरोनामुक्त ठेवणे आवश्यक आहे. यासाठी गोमंतकीयांचे सहकार्य महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.