पणजी - ज्या मतदारसंघात भाजप उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाही, अशा मतदारसंघात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तळ ठोकून बसतात. त्याबरोबर ते त्यांच्याकडे असलेल्या गृहखात्याचे कार्य विसरून जातात, असा आरोप गोवा सुरक्षा मंचतर्फे करण्यात आला. येथे आयोजित पत्रकार परिषदेसाठी गोवा सुरक्षा मंच (गोसुमं)चे ज्येष्ठ उपाध्यक्ष किरण नाईक, हृदयनाथ शिरोडकर आणि उमेदवार प्रतिनिधी महेश म्हांबरे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिरोडकर म्हणाले, गोव्याचे गृहमंत्रालय अकार्यक्षम ठरले आहे. या खात्याचा भार मुख्यमंत्र्यांकडेच असून मुख्यमंत्री प्रचारात दंग आहेत. गोव्यात सुरु असलेल्या निवडणुकीत जेथे भाजप उमेदवार 100 टक्के पडणार असे दिसते, अशा मतदारसंघात मुख्यमंत्री सावंत ठाण मांडून बसत आहेत. तेथे कोपरासभा घेत आहेत. त्यामुळे 'बाल सुधारगृहातील' अत्याचार पीडित गायब झाली तरी त्याचा पत्ता लागत नाही. हे भाजप सरकार आहे. येथे महिला, मुली सुरक्षित नाहीत. सदर पीडिता ही काँग्रेस उमेदवार बाबूश मोन्सेरात प्रकरणातील असल्यामुळे भाजप बाबूशना वाचविण्यासाठी हे सेटिंग तर करत नाही ना, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
तर ज्येष्ठ उपाध्यक्ष नाईक यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी गोवा सुरक्षा मंचचे उमेदवार सुभाष वेलिंगकर यांच्यावर केलेल्या टीकेचा जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले, आज जे वेलिंगकर यांना आव्हान देत निवडून येण्याची हिंमत आहे का? असे विचारत आहेत, ते विसरले की, 1994 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख असताना वेलिंगकर यांनी भाजपला तीन स्वयंसेवक देत म्हटले होते की, पुढील 10 वर्षांत गोव्यात भाजपची सत्ता आणण्याचा संकल्प केला होता. ते करून दाखवले. भाजप प्रदेशाध्यक्षांनी रविवारी केलेल्या टीकेमुळे भाजप उमेदवार कदाचित दुसऱ्या क्रमांकावर राहिला असता तो आता सरळ तिसऱ्या किंवा खालच्या क्रमांकावर जाईल. कारण जे भाजपचे खंदे समर्थक आहेत ते अप्रत्यक्ष गोसुमंचा प्रचार करत आहेत.
ज्या वेलिंगकर यांनी भाजपला तीन वरून 21 वर नेले आणि 13 वर आणून ठेवले त्यांची हिंमत भाजप पदाधिकाऱ्यांना दिसली असेल, असे सांगून नाईक म्हणाले, गोसुमंची लढाई भाजपशी नसून काँग्रेससोबत आहे. त्यामुळे या दोघांमध्ये खरी लढत होईल.