पणजी - गोव्यातील अॅप आधारीत टॅक्सीसेवा (गोवा माईल्स अॅप) रद्द करावी अशी मागणी गोव्यातील पारंपरिक टॅक्सी संघटना करत आहेत. तर दूसरीकडे ही सेवा सुरूच राहिल आणि गोमंतकियांनी नवे तंत्रज्ञान स्वीकारले पाहिजे, असे गोवा सरकारने आज विधानसभेमध्ये शून्य प्रहरच्या तासाला सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी शून्य प्रहर तासात या संदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.
गोवा माईल्स अॅप आधारीत टॅक्सीसेवेमुळे किनारी भागातील पारंपरिक टॅक्सीसेवा धोक्यात आली आहे. ज्यामुळे या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. अशावेळी गोमंतकियांना रोजागर देणारा व्यवसाय वाचविण्यासाठी सरकारने गोवा माईल्स रद्द करावे अशी मागणी चर्चिल आलेमाव केली होती.
गोवा माईल्स अॅप बंद करण्यासंबंधी उत्तर देताना पर्यटनमंत्री मनोहर आजगावर म्हणाले, काही पर्यटक टॅक्सीवाल्यांमुळे गोव्याचे नाव जगभरात खराब होत आहे. गोवा माईल्स अॅपसेवा सरकारच्या पाठिंब्याने चालत आहे. किनारी भागातील टॅक्सी स्थानकाबाबत लवकरच निविदा काढली जाणार आहे. यासाठी टॅक्सी मालकांना कर भरावा लागणार आहे. गोमंतकियांनी नवे तंत्रज्ञान स्वीकारले पाहिजे.
आलेमाव यांनी प्रस्तावावर अर्धा तास चर्चा करण्याची मागणी केली. प्रस्तावाला सभापती राजेश पाटणेकर यांनी मंजुरी दिली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी यावर यापूर्वीच पुरेशी चर्चा झाल्याचे सांगितले. तर, वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो म्हणाले की, हे समजून घेतले पाहिजे की, गोवा माईल्समुळे लोक खूश आहेत की नाही? विमानतळावर येणारे पर्यटक अॅपसेवा शोधत असतात. हे पर्यटकांना सोयीचे आहे की नाही? की केवळ गोंयकारपणाच्या नावाखाली गोव्याचे नाव खराब झालेले चालेल. अॅप आधारीत टँक्सीसेवा बंद करा ही मागणीच चुकीची आहे. यावरून गोमंतकियांमध्ये गैरसमज पसरवू नयेत. अन्य राज्यात अशी सेवा सुरळीतपणे चालू आहे. मात्र, गोवा आणि इतर राज्यांमध्ये फरक आहे. इतर इतर राज्यात ओला, उबेर वापरले जाते तर आपण स्वतः चे मोबाईल अॅप (गोवा माईल्स अॅप) वापरतो.