पणजी - अल शद्दाई या बिगर सरकारी संस्थेने आयोजित केलेल्या गोवा मेरेथॉनला अॅथलिट्सकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला. 21 किलोमीटरच्या अर्धमॅरेथॉनमध्ये कुडगा-तिसवाडीचा स्टेटी कार्दोज विजेता ठरला. त्याने 1 तास 10 मिनिटांमध्ये हे अंतर पार केले. कांपाल-पणजी येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत देशविदेशातील अॅथलिट सहभागी होते. यामध्ये पाच वर्षाखालील मुलांपासून 70 वर्षांहून अधिक वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग घेतला.
मागील वर्षी या मॅरेथॉनमध्ये चौथा क्रमांक पटकवल्यानंतर यंदा कार्दोसने प्रथमस्थानी राहण्याचा मान मिळवला. माध्यमांना प्रतिक्रिया देताना, जिंकण्याच्या उद्देशाने दोन आठवड्यांपासून कसून सराव करत असल्याचे त्याने सांगितले. तसेच यापूर्वी गोवा विद्यापीठातील पाच हजार मीटर आणि दहा हजार मीटरचे अंतर पार करत नवा विक्रम केल्याचा अनुभव होता, असे तो म्हणाला. यंदा स्वत:चा विक्रम मोडल्याची माहिती त्याने दिली.
मागील नऊ वर्षांपासून मॅरेथॉनचे आयोजन करत असल्याची माहिती आयोजक मॅथ्यु कुरियन यांनी दिली. लोकांना आरोग्यदायी चांगल्या सवयी लागण्यासाठी हा प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. या मॅरेथॉनच्या माध्यमातून प्राप्त होणारा निधी गरीब आणि अनाथांसाठी दान करण्यात येतो, असे ते म्हणाले. तसेच संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत 70 हजारांपेक्षा अधिक मुलांना मदत करण्यात आली आहे. 14 हजार कुटुंबाना आधार देण्यात आला आहे. सध्या संस्था दररोज 3500 हून अधिक मुलांना आसरा देण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
या स्पर्धेसाठी लोकांनी सकाळपासूनच कांपाल परिसरात गर्दी केली होती. तसेच मॅरेथॉनच्या मार्गावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.