पणजी - 'थर्ड क्लास' पक्षात जाऊन आम्हाला राजकीय आत्महत्या करायची नाही,' अशी सणसणीत टीका गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सेनेवर केली आहे. नुकतेच संजय राऊत यांनी गोव्यातील चार आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य केले होते. यावर बोलताना, ज्या पक्षाला गोव्यात एकही आमदार निवडून आणणे शक्य नाही, अशांच्या तोंडात ही भाषा शोभत नसल्याचे ते म्हणाले.
तत्कालीन नेते मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील गोव्यातील भाजप मोठ्या प्रमाणात धर्मनिरपेक्ष झाला असून येथील भाजप आणि अन्य ठिकाणच्या भाजपमध्ये फरक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तलवार काढणाऱ्या पक्षांची आम्हाला गरज नसून तलवारी हव्या असल्यास आमच्या घरच्या पारंपरिक संग्रहातून देतो, असा टोला राणेंनी लगावला आहे.
मिरामार येथील खासगी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना, म्हादई नदी प्रश्नावरुन विरोधकांडून माझ्यासह सरकारला लक्ष्य करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, मुख्यमंत्र्यांवर मला पूर्ण विश्वास असून ते योग्य मार्ग काढतील, असे राणे म्हणाले.
शिवसेनेचे गोवा प्रभारी संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना, महाराष्ट्रात शिवसेना सत्तेत आली, म्हणून गोव्यात तसे होणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गोव्यात भूकंप होणार नाही; पण झालाच तर सहा महिन्यानंतर महाराष्ट्रातच होईल, असा सूचक इशारा राणे यांनी दिला आहे. यासाठी सेनेने महाराष्ट्रात लक्ष द्यावे. गोवा अस्थिर करण्याचा प्रयत्न करू नये, असे ते म्हणाले.
गोव्यात विरोधी पक्षांची आघाडी होण्याची शक्यता विचारात घेऊन राणे यांनी राज्यातील सर्व 30 आमदार हे मुख्यमंत्री आणि सरकारसोबत खंबीर असल्याचे सांगितले.
दरम्यान, गोवा वैद्यकीय क्षेत्रातील आवश्यक जागांच्या जाहिरातींसंदर्भात बोलताना 31 डिसेंबरनंतर नवीन पदे भरण्याकडे लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली. तसेच पुढील दोन वर्षांतील सरकारच्या कालावधीत गरजेनुसार जागा भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
11 व 12 डिसेंबरला वैद्यकीय सेवेतील बहुपर्यायी कामगार संपावर जाण्याच्या बेतात असल्याची माहिती राणेंनी दिली. त्यामुळे आम्ही अँस्मा कायदा लावण्याचा विचार करत असून यानंरही कोणी संपावर गेल्यास त्यांना कायमस्वरुपी कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याचे राणे यांनी सांगितले.