पणजी - गोव्यातील सर्वसामान्य जनतेला स्थानिक भाजप नेतृत्व आणि राज्य सरकार यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे ते सरकार सोबत असतात. परंतु, राज्यात एनजीओ मानसिकता असलेले लोक आहेत. ते नसलेले प्रश्न निर्माण करतात, असे मत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले. पणजीतील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्याच्या काही नगरपालिका क्षेत्रात काही दिवसांपूर्वी काही मुद्द्यांवर वादंग निर्माण झाला होता. त्यानंतर नगरपालिका निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजप पुरस्कृत उमेदवार विजयी झाले आहेत. याकडे कसे पाहता असे विचारले असता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, सर्वसामान्य जनता राज्य सरकार विश्वास ठेवून आहे. त्यामुळे नगरपालिकेत विजय प्राप्त करता आला आहे. ही निवडणूक जरी पक्ष चिन्हावर लढली गेली नसली तरीही भाजप कार्यकर्ते सोबत होते. संघटनात्मक कामामुळे विजय प्राप्त केला आहे. तसेच येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप पूर्ण बहुमतात निवडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा-विदारक : संशयित कोरोना रुग्णांची तीन तासांहून अधिक लॅबसमोर अहवालाकरता प्रतीक्षा
आमदार स्थानिकांच्या कसोटीला उतरले - सदानंद तानावडे
भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे म्हणाले की, नगराध्यक्ष आणि महापालिका निवडणूक ही अशा आमदारांच्या मतदारसंघात पार पडली की ज्यांनी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. यासंदर्भातील याचिकेवर सभापतींसमोर सुनावणी होत असते. अशावेळी कुंकळ्ळी वगळता अन्य नगरपालिकांमध्ये भाजप आमदार पुरस्कृत पॅनलने विजय मिळविला आहे. हाच धागा पकडून बोलताना तानावडे म्हणाले की, भाजपच्या स्थानिक आमदारांनी लोकांमध्ये जाऊन प्रचार केला. त्यामुळे नगरपालिका क्षेत्रात कॉंग्रेसला खातेही खोलता आले नाही. या विजयाने सदर आमदारांनी लोकांचा विश्वास संपादन करत आपल्यासमोरील प्रश्न चिन्ह दूर केले आहे.
हेही वाचा-अनिल देशमुखांविरोधात परमबीर सिंग सर्वोच्च न्यायालयात, याचिकेतून भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांना टोला-
मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या विधानसभा मतदारसंघातील साखळी नगरपालिका क्षेत्रात प्रभाग 9 मध्ये भाजपला विजय प्राप्त करता आलेला नाही. याचे विश्लेषण करताना तानावडे म्हणाले, 1999 पासून आतापर्यंत भाजपला त्या प्रभागात विजय प्राप्त करता आलेला नाही. त्यामुळे पराभवाचे आत्मपरीक्षण केले जाईल. आज निवडून आलेल्या 105 नगरसेवकांमध्ये भाजप पुरस्कृत 85 नगरसेवक आहेत. ही एनजीओ मानसिकता असलेल्यांना चपराक आहे. तर दुसरीकडे केवळ एका जागेवर जिल्हा पंचायत पोटनिवडणूक होऊन तीही कॉंग्रेसला जिंकता आलेली नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी ' मुंगेलीलाल के हसीन सपने' पाहू नयेत, असा टोलाही त्यांनी हाणला.
पत्रकार परिषदेला आरोग्य मंत्री विश्वजीत राणे, उर्जा मंत्री नीलेश काब्राल, सभापती राजेश पाटणेकर व आमदार बाबुश मोन्सेरात आदी उपस्थित होते.