पणजी - अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे गोव्यातील सर्वधर्मियांनी स्वागत केले आहे. गोव्यात सर्वधर्मियांचे सरकारला सहकार्य मिळत असते. त्यामुळे गोवा शांतताप्रिय आणि सर्वधर्मसमभाव यांसाठी ओळखला जातो. ही ओळख तशीच कायम रहावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
आल्तिनो येथील ' महालक्ष्मी' या सरकारी निवास्थानी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, आज सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जाहीर होणार असल्याने सकाळपासून दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलिस महासंचालक यांच्या संपर्कात आहे. न्यायालयाच्या या निर्णयाकडे सर्व पक्ष आणि धार्मिक नेते यांनी याकडे संयमाने पाहत स्वागत करावे. कारच येथील हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन यांनी या निर्णयाचे शांतपणे स्वागत केले आहे. त्याबद्दल आभारी आहे.
गोवा नेहमीच शांतताप्रिय आणि समभाव यासाठी यासाठी ओळखला जातो. कोणीही कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन न करता, ही ओळख कायम रहावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी केले.