पणजी (गोवा) - कायद्याचा धाक हा प्रत्येकाच्या मनात असायला हवा. आज गोव्यातील गुन्हेगाराxच्या मनातील तो धाक संपुष्टात येत आहे. हा धाक पुन्हा निर्माण करून आज गोव्यातील जनतेला सुरक्षित वातावरण मुख्यमंत्र्यांनी करावे अशी आशा आहे. मात्र, मुख्यमंत्री सावंत यांनी केलेले वक्तव्य हे बेजबाबदार आहे असे म्हणत उद्योजिका प्रिया राठोड यांनी या विधानाचा निषेध केला आहे. त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री होतांना जी शपथ घेतली होती की मी गोव्यातील सर्व जनतेच्या सुरक्षितेची जबाबदारी घेतो. ती शपथ निभावण्यात ते कमी पडले आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी -
गोव्यात भाजपचे सरकार जेव्हापासून आली आहे तेव्हापासून गोवावासियांच्या मनात एक भयावह स्थिती निर्माण झाली आहे अशी प्रतिक्रिया गोवा महिला प्रदेशाध्यक्ष बिना नाईक यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विधानावर गोव्याच्या सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय, त्यातच शुक्रवारी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्रांच्या घरासमोर मोर्चा काढून त्याच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मुख्यमंत्री सावंत यांच्या राज्यात महिला सुरक्षित नसल्याचा आरोप गोव्यातील महिलांनी केला आहे.
पोलिसांचे धाक संपला -
लोकांमधील पोलिसांचे धाक संपला आहे, पोलीस योग्य प्रकारे पेट्रोलिंग करत असते तर ही दुर्देवी घटना झाली नसली. पून्हा पोलिसांचा धाक निर्माण करण्याची गरज आहे. तसेच मुख्यमंत्री ही असे वक्तव्य करतात हे निषेधार्त आहे असे मत यावेळी प्रतिभा बोरकर या गृहिणीने व्यक्त केले.
गोव्यातील सुरक्षाही रामभरोसे -
गोवा राज्य हे फ्रिडमसाठी ओळखले जात होतो. आज जे क्राईम वाढत आहेत त्यामुळे नागरिकात मोठ्या प्रमाणात भय निर्माण झाले आहे. गोव्यातील स्त्रीयांना, मुलींना आज रात्री बाहेर काम करू शकत नाहीत, मुलगी केव्हा घरी येईल याची आज कुटुंबियाला चिंता लागलेली असते. आज शिकलेल्या मुली काम करतात त्या ठिकाणीही त्यांना सुरक्षित वातावरण नाही आहे. गोव्यातील सुरक्षाही रामभरोसे सोडली आहे असे मत क्रांतीकारी गोवन्सच्या सूनयना गावडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.
पावसाळी अधिवेशनात रणकंदन -
बाणावली समुद्रकिनारी दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्काराच्या घटनेचा मुद्दा बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी प्रथम पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला. नंतर विरोधकांनी यावर रणकंदन माजवले असता, मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी ही त्यांच्या पालकांची असून यासाठी प्रत्येक वेळी सरकार आणि पोलिसांना जबाबदार धरू नये, असे विधान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत केले होते.
सुरक्षा वाढविण्याची मागणी -
दरम्यान राज्यात घडणाऱ्या या महिला अत्याचाराच्या घटनांवरून, राज्यात विशेषतः समुद्रकिनारी पोलीस सुरक्षा वाढवत गस्ती पथके, तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पोलीस पथकांची व्यवस्था सरकारने करावी अशी मागणी राज्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांची सारवासारव -
राज्यात चहुबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर आपल्या मुलीचा दाखला देत आपण ते विधान राज्यातील मुलींच्या काळजीपोटी केल्याची सारवासारव मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
कोविड काळातही महिला अत्याचाराचा आलेख चढता
गोव्यात जानेवारी 2021 पासून आतापर्यंत महिला अत्याचाराच्या तब्बल 153 प्रकरणाची नोंद झाली आहे. यामध्ये बलात्कार, विवाहितेचा हुंड्यासाठी छळ, लैंगिक अत्याचार, विनयभंग, वेश्या व्यवसायास प्रवृत्त करणे अशा घटनांच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. त्यापैकी 142 गुन्ह्याचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक 45 घटना बलात्काराचा असून 44 प्रकरणात पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे. जानेवारी 2021 पासून आतापर्यंत 20 महिलांचे अपहरण झाले आहे. तर 23 महिलांची छेडछाड आणि 55 महिलांच्या विनयभंगाच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. एका विवाहित महिलेची घरगूती कारणावरून छळवणूक झाल्याचीही तक्रार नोंद करण्यात आली आहे. तर 9 महिलांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे.