पणजी - कोरोना विषाणू संसर्गाच्या साथीने जगभरातील मानवीजीवनावर आघात केला आहे. भारतातही याचा वेगाने प्रसार होत आहे. अशा वेळी सरकारला गरजूंना साधन सुविधा उपलब्ध करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असते. कोविड-19 च्या या लढ्यात उद्योगांनी कार्पोरेट सामाजिक दायित्व अंतर्गत सरकारला मदत करावी, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आपल्या आवाहन पत्रात म्हटले आहे, की कोरोना विषाणू संसर्ग विचारात घेऊन केंद्रीय उद्योग मंत्रालयाने कोविड-19 साठी केलेली मदत ही 'कार्पोरेट सामाजिक दायित्व ' (सीएसआर) साठी पात्र असल्याचे घोषित केले आहे. सीएसआर कायद्याच्या अनुसूची 7 प्रमाणे आरोग्यासाठी उपाययोजना आणि रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून याचा समावेश करण्यात आला आहे. कोविड-19 चा सामना करत असताना सर्व प्रकारच्या उत्पनाची साधने थांबवली आहेत किंवा कमी करण्यात आली आहेत, ज्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडत आहे. त्यामुळे पुरेशा आरोग्य सुविधांचा उपलब्ध करण्यासाठी उद्योगांनी सरकारला आर्थिक मदत करावी, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. याकरिता राज्य सरकारच्या अर्थखात्याकडून लवकरच बँक खाते उघडण्यात येईल. यासाठी आवश्यक माहिती प्रसिद्ध केली जाईल, असेही म्हटले आहे.