पणजी - कोळशाच्या खाणी व वाहतुकीवरून गोव्यात सत्ताधारी असलेला भाजप आणि विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेल्या आरोपाला काँग्रेसने प्रत्युत्तर देत कोळसा वाहतुकीचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे.
काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मोरमुगाओ बंदरावर कोळसा हाताळणीचे प्रमाण २०१२ मध्ये ५ दशलक्ष टन वाढविल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी आरोप केला. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी कोळसा हाताळणी ५ दशलक्ष टनने वाढविल्याचे कागदपत्रे माझ्याकडे आहेत. त्यावेळी राज्यात आचारसंहिता सुरू होती, असेही सावंत यांनी म्हटले होते. त्यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते लूईझिन्हो फॅरेरिओया यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. जर काँग्रेसने चुक केली तर सध्याच्या भाजप सरकारने सुधारणा करून निर्णय रद्द करायला हवा, असे फॅरेरिओया यांनी म्हटले आहे.
हा आहे वाद-
दरम्यान, पश्चिम घाटांमधील ५० हजार झाडे विविध केंद्र सरकारच्या प्रकल्पांसाठी तोडण्यात येणार आहेत. या प्रकल्पांमध्ये रेल्वे रुळ, महामार्ग आणि विद्युतवाहिनी यांचा समावेश आहे. या प्रकल्पाला आणि कोळसा वाहतुकीला विविध नागरी संघटनांसह काँग्रेसने विरोध केला आहे.