पणजी - महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमीत्त गोव्यात तीन दिवसांच्या निसर्गोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून निसर्गोपचार आणि महात्मा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आहे, असे मत केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले.
या शिबिराचे उद्घाटन गोव्याच्या राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मिरामार ते कला अकादमी दरम्यान पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेत श्रीपाद नाईक, निसर्गोपचार संस्थेच्या सत्य लक्ष्मी आणि देशाच्या विविध भागांतून उपस्थित राहिलेले शिबिरार्थी सहभागी झाले.
हेही वाचा - गांधी@150; ईटीव्ही भारतच्या माध्यमातून देशातील सर्वश्रेष्ठ गायकांकडून बापूंना संगीतमय श्रद्धांजली
निसर्गोपचार शिबिराच्या निमित्ताने तज्ञ लोकांच्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे निसर्गोपचारांविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्यास मदत होईल. निसर्गोपचार शिबिराला देशाच्या विविध भागांतून चांगला प्रतिसाद लाभला आहे. या शिबिरानंतरही येथील डॉक्टरांचे कार्य सुरू राहणार आहे, अशी माहिती श्रीपाद नाईक यांनी दिली. या शिबिरात जास्तीत जास्त गोमंतकियांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन नाईक यांनी केले.