पणजी - भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मांद्रे मतदारसंघातील उमेदवारीवरून निष्ठावंत आणि नवनिष्ठावंत असा वाद सुरू झाला आहे. भाजपाने 2019 साली सत्ता बळकट करण्यासाठी काँग्रेसमधून आयात केलेल्या आमदार दयानंद सोपटे आणि माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या उमेदवारीवरून वाद निर्माण झाला आहे. 2017 साली तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा दयानंद सोपटे यांचा पराभव केला होता. मात्र 2019 साली भाजपने सोपटे यांना सत्ता बळकटीकरणासाठी पक्षात घेतले होते. तेव्हापासून पार्सेकर भाजपात नाराज होते, वेळोवेळी त्यांनी आपली नाराजी व्यक्त करूनही दाखविली. मात्र पक्षाने आणि मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी त्याला विशेष महत्व दिले नाही. तेव्हापासून पार्सेकर पक्षकार्यापासून दूर होते.
पार्सेकरांची नाराजी दूर करण्याचा भाजपचा प्रयत्न -
मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी मंगळवारी आमदार दयानंद सोपटे यांच्यासोबत मांद्रे मतदारसंघाचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी अनेक विकासकामांचा शुभारंभ केला. प्रोटोकॉलप्रमाणे पार्सेकर यांनाही या दौऱ्याचे आमंत्रण देण्यात आले होते. या दौऱ्यात पार्सेकर आणि सोपटे याना एकाच व्यासपीठावर आणून दोघांमधली नाराजी दूर करण्याचा पक्षाने ठरविले होते. मात्र, पक्षादेश मानून पार्सेकर यांनी सोपटे यांच्यासमवेत न जाता स्वतंत्रपणे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे हरमल येथे स्वागत केले.
आपल्या उमेदवारीवर पार्सेकर ठाम -
मांद्रे मतदारसंघ हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ. 1988 पासून पार्सेकर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. यातुनच पुढे 2014 साली राज्याचे मुख्यमंत्री झाले. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना भाजपाने केंद्रात संरक्षण मंत्री पद बहाल केल्यावर पार्सेकर यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली. मात्र, 2017 सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेस उमेदवार दयानंद सोपटे यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला, तेव्हापासून पार्सेकर अज्ञातवासात होते. मात्र, आत्ता राज्यात 2022च्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. त्यातच मुख्यमंत्री दयानंद सोपटे यांना जवळ करत असल्यामुळे भविष्यात आपल्या राजकीय पुनरागमनासाठी ते याच मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवारीवर आपला दावा करीत आहेत.
पार्सेकर विरुद्ध दयानंद सोपटे -
मांद्रे मतदारसंघात भाजपचा पारंपरिक मतदार आहे. कित्येक वर्षे हा भाजपचा गड राहिला आहे. पार्सेकर मुख्यमंत्री असताना त्यांनी विशेष लक्ष आपल्या मतदारसंघावर दिले होते. तरीही त्यांना 2017 साली पराभवाचा सामना करावा लागला. त्यातच सोपटे 2019 ला भाजपवासी झाल्यावर त्यांनी मतदारसंघात अनेक विकासकामे केली. भरीस भर म्हणून नुकतीच नाराज पार्सेकर यांची गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी पार्सेकरांची भेट घेतली. तेव्हापासून पार्सेकर गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश करणार, की भाजपकडून जरी त्यांचे तिकीट कापले गेले तर अपक्ष निवडणूक लढणार का याबाबद्दल चर्चा सुरू झाली. या एकंदर परिस्थिती वरून निष्ठावंत पार्सेकर विरुद्ध नवनिष्ठावंत दयानंद सोपटे समर्थकांना सांभाळून आपला गड राखण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर आहे.