पणजी (गोवा) - कोरोना काळात सतत लोकजागृतीच्या आघाडीवर असलेले पणजीचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा पोलीस उप-अधीक्षक उत्तम राऊत-देसाई यांचे मंगळवारी (26 मे) रात्री बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर काही महिन्यांपूर्वीच हृदय शस्त्रक्रिया झाली होती. एक महिन्यापूर्वी आजारी पडल्याने त्यांना गोमेकॉत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच मंगळवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. गोव्याचे डिजीपी कुमार मिणा यांनी देसाईंच्या गाण्याचा व्हिडिओ शेअर करत त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. याबाबतचे ट्विट कुमार मिणा यांनी केले आहे.
डीजीपींनी शेअर केला उत्तम राऊत देसाईंचा जनजागृतीचा व्हिडिओ
पोलीस उप-अधीक्षक उत्तम राऊत देसाई यांच्या आठवणींना खुद्द डिजीपींनीही व्हिडिओ शेअर करत उजाळा दिला आहे. कोविडच्या महामारीत जनजागृती करण्यासाठी उत्तम देसाई नेहमीच आघाडीवर होते, असे मिणा यांनी म्हटले आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरुन निघणार नाही, असे म्हणत डिजीपींनीही उत्तम देसाईंच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. दरम्यान, उत्तम देसाईंचा जनजागृती करतानाचा एक व्हिडिओही डिजीपींनी शेअर केला आहे. उत्तम राऊत देसाईंच्या निधनामुळे गोवा पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.
गाणे गाऊन केली होती कोरोनाबाबत जनजागृती
एक धाडसी पोलीस अधिकारी अशी देसाईंची ख्याती होती. कोविडच्या पहिल्या लाटेवेळी त्यांनी लोकजागृतीसाठी मोठे काम केले होते. विशेष म्हणजे लोकांना घराबाहेर पडू नका, तसेच मास्कचा वापर करा आणि हात स्वच्छ धुण्याबाबतचा संदेश त्यांनी स्वतः गाणे गाऊन दिला होता. त्यांना इतर आजारांचा त्रास होता आणि त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नव्हते. गोव्याचे डिजीपी कुमार मिणा यांनी आपल्या ट्विटमध्ये त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा - पहिल्याच दिवशी आर्थिक मदतीसाठी २२ हजार रिक्षा चालकांचे अर्ज