पणजी - कोरोना विषाणू संसर्ग प्रसार थांबविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेली सप्तपदी सर्वांनी पाळणे गरजेचे आहे. त्यामुळे गोवा सरकारची बुधवारपासून होणारी प्रशासकीय कार्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय 20 एप्रिलनंतरच घेतला जाईल, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
महालक्ष्मी निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले, पंतप्रधानांनी दि. 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविल्यामुळे दि. 14 एप्रिलपर्यंतच्या मुदतीसाठी स्वयंसेवक आणि वाहतुकीसाठी दिलेले पास 3 मे पर्यंत कायम राहणार. त्यामुळे नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. कोविड-19 संसर्गात उत्तर गोवा रेड झोनमध्ये तर दक्षिण गोवा ग्रीन झोनमध्ये आहेत. त्यामुळे पंतप्रधानांनी सांगितलेली सप्तपदी पाळणे गरजेचे आहे. त्याबरोबर दोन्ही जिल्ह्यात सामाजिक अंतर पाळणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आरोग्य सेतू अँप डाऊनलोड करावे. लॉकडाऊन काळात गरीबांना धान्य देण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 25 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
सोमवारपासून सुरू करण्यात आलेल्या सामाइ सर्व्हेला गोमंतकीयांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे, असे सांगून डॉ. सावंत म्हणाले, राज्याच्या आठही सीमेवर सँनिटायझर टनेल उभारण्यात येणार आहेत. मालवाहतूक करणारे ट्रक चालक गोव्यात राहू नयेत याची काळजी घेण्यात येणार आहे. कोरोना नियंत्रणात येईपर्यंत पर्यटन उद्योगावर नियंत्रण राहणार आहेत.
सरकारने आतापर्यंत 11 बांधकाम कामगारांना प्रत्येकी 6 हजार रुपये दिले आहेत. यामध्ये 10 हजार 500 कामगार गोमंतकीय आहेत. त्यामुळे विरोधकांनी नको त्या गोष्टींचा बाऊ करू नये. या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात सर्वांनी योगदान देण्याची गरज आहे. विदेशात अडकलेल्या गोमंतकीय खलाशांना परत आणण्याबाबतचा अहवाल दोन दिवसांत पंतप्रधानांसमोर मांडला जाणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, गोव्यात सुरु असलेल्या विविध सामाजिक योजना बंद होणार नाहीत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्य सरकारच्यावतीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पाटो-पणजीतील उद्यानात असणाऱ्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.