पणजी - राज्यात एककीकडे कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावलेला असताना राज्यात कर्फ्यूवाढीचे सत्र सुरूच आहे. यातून थोडी शिथिलता देण्यात आली आहे. राज्यातील कोरोनामुळे होणारे मृत्यूचे सत्र अद्याप थांबले नसल्याने कर्फ्यूत 9 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी रात्री जारी केला. या आदेशानुसार राज्यातील बार आणि रेस्टॉरंट रात्री 11 पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.
नव्या आदेशानुसार काय सुरू? काय बंद? -
सध्या केरळात रुग्णवाढीचे प्रमाण वाढत असून तिथून राज्यात येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. अन्य राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना लसीकरणचे दोन डोस किंवा 72 तासातील कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र दाखवणे आवश्यक आहे. शिक्षण संस्था बंद असल्या तरी शाळा, महाविद्यालयांना परीक्षा घेण्यासाठी मोकळीक देण्यात आली आहे.
कॅसिनो, स्पा, मसाज पार्लर बंदच -
मागच्या काही दिवसांपासून सरकारने लसीकरणाच्या दोन मात्रा घेतलेल्या पर्यटकांना राज्यात प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, गोव्यातील पर्यटनाचा सर्वात मोठा दुवा असणाऱ्या कॅसिनो, स्पा, मसाज पार्लर आणि रिव्हर क्रूझला सरकारने अद्याप परवानगी दिली नाही. तसेच राज्यात पाऊस असल्याने पर्यटकांना समुद्रात उतरण्यासाठीही बंदी घालण्यात आली असून यामुळे पर्यटकांचा काही प्रमाणात हिरमोड झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना सरसकट प्रवेश -
नजीकच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक नागरिक कामानिमित्त दररोज ये-जा करत असतात. मात्र, मागच्या काही दिवसांपासून कोविडमुळे येथील नागरिकांना राज्यात प्रवेश करताना अनेक बंधने घालण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक तरुण-तरुणींच्या रोजगारावर गदा येत होती. अखेर जिल्ह्यातील भाजपाच्या मध्यस्तीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना राज्यात सरसकट प्रवेश देण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान शिवसेना-भाजपाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले