पणजी - उत्तर गोव्यातील कोलवाळ मध्यवर्ती काराग्रुहातील कच्चा कैदी (अंडर ट्रायल) म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आला असता, तेथे साथिदारांच्या मदतीने पोलिसांवर गोळीबार करत फरार झाला. गुन्हे अन्वेषण शाखेने वेगाने कारवाई करत कैदी विवेक गौतम याच्यासह त्याचा साथीदार मोहित गौतम यालाही गोवा-महाराष्ट्र सीमेवर पत्रादेवी येथे ताब्यात घेतले आहे.
पोलिसांवर टाकली मिरची पूड-
चित्रपटातील कथा वाटावी अशी ही घटना मंगळावारी (दि.30) रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. पर्वरीसह अन्य ठिकाणी गुन्हे दाखल असलेला कच्चा कैदी विवेक गौतम ऊर्फ आर्यन (28 वर्षे, मूळ- आग्रा-उत्तर प्रदेश) कोलवाळ तुरुंगात आहे. त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने म्हापसा येथील सरकारी इस्पितळात रुग्णवाहिकेद्वारे आणण्यात आले. तपासणीनंतर रुग्णालयातून बाहेर पडत असताना बेडीला हिसका देत ती बेडी तोडून कैद्याने पळ काढला. त्याचा पाठलाग करतात कैदी विवेकचा साथीदार रुग्णालयाच्या फाटकावर दबा धरून बसला होता, त्याने पोलिसांवर मिरची पुडीचा मारा केला. तर अन्य एकटा मोटारसायकलने विवेकला घेऊन पळाला. पोलिसांनी मिरचीपूड मारणाऱ्याला पकडलेले पाहून ते दोघेही परतले आणि देशी कट्ट्याने पोलिसांवर गोळी झाडली. पोलीस बचाव करताना दिसताच ते तेथून फरार झाले.
पोलिसांची कूमक दाखल-
घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच उत्तर गोवा पोलीस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून, उपधीक्षक गजानन प्रभूदेसाई, निरीक्षक तुषार लोटलीकर आदी दाखल झाले. त्यानंतर तत्काळ पोलीस पथकांची विविध ठिकाणी रवानगी करण्यात आली. दरम्यान, कैदी विवेक आणि त्याचा एकसाथीदार मोहित गौतम याला गुन्हे अन्वेषण विभागाने महाराष्ट्र सीमेवर पत्रादेवी येथे अटक करत रात्री रायबंदर- येथे आणले होते.