पणजी - सत्तरी-वाळपई परिसर हा काँग्रेस आमदार प्रतापसिंह राणे आणि भाजप आमदार विश्वजीत राणे यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, या परिसरातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे काँग्रेस उमेदवार गिरीश चोडणकर म्हणाले. आज वाळपईत प्रचारादरम्यान ते बोलत होते.
चोडणकर यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी उत्तर गोवा मतदारसंघात सायकल फेरी काढली होती. त्यावेळी लोकांशी संपर्क साधत प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली होती. त्यानंतर आज पुन्हा ते वाळपई परिसरातील मतदारांच्या भेटीसाठी आले होते.
खाण व्यवसाय बंद झाल्याने या परिसरातील लोकामध्ये मोठ्याप्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली आहे. तसेच गेल्या ७ वर्षांमध्ये कोणत्याही प्रकारची रोजगार भरती करण्यात आलेली नाही. काँग्रेस सत्तेत असताना वाळपईतील युवकांना मोठ्याप्रमाणात रोजगार मिळत होते, असेही ते म्हणाले.
विश्वजीत राणे यांना मुख्यमंत्रीपदापासून डावलले. तसेच त्यांना उपमुख्यमंत्री किंवा कोणत्याही प्रकारचे प्राधान्यक्रम असलेले स्थान मंत्रीमंडळात दिले नाही. त्यामुळे येथील युवकांना हा त्यांचा अपमान वाटतो. त्याचा बदला मतदानातून घेण्यासाठी ते उत्सुक आहेत. त्याचाही आम्हाला फायदा होणार असल्याचे चोडणकर म्हणाले.