पणजी - पणजी विधानसभा मतदारसंघात 19 मे रोजी पोटनिवडणूक होत आहे. यासाठी माजी आमदार बाबूश मोन्सेरात यांनी काँग्रेसकडून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते.
बाबूश मोन्सेरात यांनी पणजीचे ग्रामदैवत असलेल्या महालक्ष्मीचे आज सकाळी दर्शन घेतले. त्यानंतर अवर लेडी ऑफ इम्येक्युलेट चर्चमध्ये जावून त्यांनी प्रार्थना केली. त्यानंतर उपजिल्हाधिकाखरी कार्यालयात जावून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार प्रतापसिंह राणे, रवी नाईक, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर आणि काँग्रेस आमदार, नगरसेवक आणि पणजी महापौर उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज चौथा दिवस होता.
मोन्सेरात म्हणाले, प्रत्येक पणजीवासीयांनी विकासासाठी मला संधी द्यावी. पुढील दोन वर्षात विकास काय असतो, हे दाखवून देईन. पणजी महापालिका आमच्या गटाकडे आहे. परंतु, महापालिका आयुक्त गोमंतकीय नसल्याने त्यांना स्थानिक भाषेतील प्रश्न समजून येत नाहीत. पणजीचा विकास करायचा असेल तर महापालिका आयुक्त हा गोमंतकीय असला पाहिजे. यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गोव्यात २३ मेनंतर काँग्रेस सरकार स्थापन करेल- बाबू कवळेकर
विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर म्हणाले, बाबूश मोन्सेरात यांनी पणजीजवळील ताळगाव मतदारसंघाचे आमदार असताना विकास कसा केला जातो हे दाखवून दिले आहे. निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर गोव्यात काँग्रेस सरकार स्थापन करेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. तीन विधानसभा पोटनिवडणूक आणि दोन लोकसभा मतदारसंघ आणि पणजी पोटनिवडणुकीत भाजपचा ६-० असा सरळसरळ पराभव होईल, असे कवळेकर यावेळी म्हणाले.