पणजी- अपघातामध्ये जखमी झालेले केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची तब्येत धोक्याबाहेर आल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. त्यांची प्रकृती स्थिर आहे. नाईक यांच्यावर दोन लहान शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी रात्री बोलताना दिली.
केंद्रीय राज्यमंत्र्यांना दिल्लीत उपचारासाठी हलविण्याची गरज नसल्याचे प्रमोद सावंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. उत्तर कर्नाटकात झालेल्या कार अपघातात केंद्रीय आयुष आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णवाहिकेतून सोमवारी रात्री सव्वा अकराच्या सुमार गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात आणण्यात आले आहे.
केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे सपत्नीक देवदर्शनासाठी जात असताना सोमवारी संध्याकाळी उत्तर कर्नाटकातील येल्लापूर येथे त्यांच्या कारला अपघात झाला. यामध्ये त्यांच्या पत्नी विजया नाईक आणि स्वीय सहाय्यक यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य चारजण जखमी झाले. यामध्ये नाईक यांचाही समावेश असून ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना यल्लापूर येथून विशेष रुग्णवाहिकेद्वारे गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आणण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह मंत्री, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच रुग्णालय परिसरात समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. गोमेकॉ परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
हेही वाचा-कृषी कायदेविरोधी आंदोलन : सर्वोच्च न्यायालय मंगळवारी जाहीर करणार निकाल
पंतप्रधानांसह केंद्रीय संरक्षण मंत्र्यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा-
श्रीपाद नाईक यांना योग्य वैद्यकीय उपचार मिळावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केल्याचे सूत्राने सांगितले. अपघातात जखमी झालेले नाईक यांना त्वरित वेगवान उपचार मिळण्याकरता केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री सावंत यांच्याशी चर्चा केली.
हेही वाचा-'बर्ड फ्ल्यू' श्वसनसंस्थेचा रोग; स्थलांतरित पक्षांच्या विष्टेतून होतो संसर्ग - डॉ. देशपांडे