पणजी - विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्या गाडीवर प्रचार संपवून घरी जात असताना गुरुवारी अज्ञांतानी हल्ला केला. याची तक्रार कुंकळ्येकर यांनी पणजी पोलिसांत दिली असून पोलिसांनी अज्ञांताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याविषयी बोलताना कुकळ्येकर म्हणाले की, गुरुवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जाहीर प्रचार सभेला लाभलेला प्रतिसाद पाहून विरोधी घाबरले आहेत. त्यातून माझ्यावर गुरुवारी मध्यरात्री हल्ला झाला. 1994 नंतर निवडणुकीत अशा प्रकारची खालची पातळी गाठली गेली आहे. उठसूट बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. परंतु, पणजीवासीय अशा प्रकारच्या प्रवृत्तींना शहरात थारा देणार नाहीत. त्यामुळे मला 10 हजारांहून अधिक मते देऊन माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना खरी श्रद्धांजली अर्पण करतील.
भाजप नगरसेवक मिनीन डाक्रुझ पत्रकार परिषदेत म्हणाले, गेल्या अनेक वर्षात काल पहिल्यांदाच पणजी मला असुरक्षित वाटली. अशा प्रकारच्या प्रवूत्तीचा आम्ही निषेध करतो. तसेच पणजीतील महिलांनी याचा विचार करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
सरकारने कुंकळ्येकर यांना अधिक सुरक्षा पुरवावी : काँग्रेस
भाजप उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्यावर खरोखरच हल्ला झाला असेल तर ते सरकारला लाजीरवाणे आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले, निवडणुकीत भाजप कोणत्याही स्तराला जाऊ शकतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सदर गुन्हेगाराला मतदानापूर्वी अटक करावी. तसेच या हल्ल्याला कुंकळ्येकर ही जबाबदार आहेत. कारण स्मार्ट सिटीचे संचालक म्हणून त्यांनी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी ठेकेदार कंपनीला वर्षभरापूर्वी रक्कम अदा केली आहे. परंतु, अद्याप कँमेरे बसवलेले नाहीत. जर सीसीटीव्ही कॅमेरे असते तर यातील गुन्हेगार तत्काळ ओळखता आले असते. त्यामुळे आता सरकारने निवडणूक संपेपर्यंत कुंकळ्येकर यांना कडक पोलीस बंदोबस्त द्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.