पणजी - गोवा मनोरंजन संस्थेच्यावतीने १७ आणि १८ ऑगस्ट रोजी १५ वा 'एशियन वुमन्स फिल्म फेस्टिवल' आयोजित करण्यात आला आहे. यावेळी महिलाविषयक १८ चित्रपट दाखवले जाणार असल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी अधिकारी अमित सतिजा यांनी दिली.
चित्रपट महोत्सवाविषयी अधिक माहिती देताना गोवा मनोरंजन संस्थेचे सतीजा म्हणाले, पहिला आशियाई महिला चित्रपट महोत्सव नवी दिल्लीत २००५ मध्ये आयोजित करण्यात आला होता. दरवर्षी हा महोत्सव लोकप्रिय होत असून प्रेक्षक आणि चित्रपट निर्माते यांचा सहभाग वाढत आहे. गोव्यात होणाऱ्या या महोत्सवात ५० चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार असून त्यापैकी १८ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये भारतासह तुर्की, इराण, अमेरिका, जॉर्जिया, तैवान, सयुक्त अरब अमिरात, इस्रायल, श्रीलंका आणि बांगलादेश येथील चित्रपट निर्माते सहभागी होणार आहेत.
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सुवर्ण महोत्सवाच्या तयारी विषयी विचारले असता सतीजा म्हणाले, आयोजनाच्या द्रूष्टीने कामाला सुरूवात करण्यात आली आहे. दरम्यान, हा चित्रपट महोत्सवात १८ वर्षांवरील प्रेक्षकांसाठी खुला असून प्रथम येणाऱ्याला प्रथम या तत्वावर प्रवेश दिला जाईल. शनिवारी संध्याकाळी ५ वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.