पणजी - कोरोनाची लागण होऊन बरे झालेल्या सातही रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, तरीही खबरदारी म्हणून त्यांना सरकारी क्वॉरेंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यातील तिघांना पुढील सात दिवस घरातच राहण्याच्या अटीवर घरी पाठवण्यात आले. त्यानंतर आपले नित्य व्यवहार करण्यास ते मोकळे असतील, तर चौघे अजूनही सरकारी क्वॉरेंटाईनमध्ये आहेत.
राज्यात 3 एप्रिलनंतर बुधवारपर्यंत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही. गोव्यात आत्तापर्यंत 1 हजार 116 संभाव्य रुग्णांचे स्वब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 1 हजार 28 अहवाल प्राप्त झाले. यामधून फक्त 7 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. 88 अहवालांची अद्याप प्रतिक्षा आहे.
बुधवारपर्यंत 1 हजार 794 जणांना होम क्वॉरेंटाईन करण्यात आले आहे. तर 255 जणांना फॅसिलीटी क्वॉरेंटाईन करण्यात आले आहे. बुधवारी तिघांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात ठेवल्याने तेथे असलेल्यांची संख्या 10 झाली आहे. काल एकाच दिवशी 112 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले, तर 92 अहवाल प्राप्त झाले. हे सर्वच्या सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
परराज्यातून एकही व्यक्ती अनधिकृतपणे गोव्यात प्रवेश करू नये यासाठी सर्व सीमा आणि पळवाटांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत स्वतः दररोज सकाळी कोणत्याही सीमेवर भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत.