पणजी - डिचोली तालुक्यातील साखळी शहरात गोवा अमलीपदार्थ विरोधी पथकाने शनिवारी रात्री छापा टाकला. त्यामध्ये एकास ताब्यात घेतले असून त्याच्याकडून पाच लाखांहून अधिक रकमेचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
साखळी (ता. डिचोली) येथील एका भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या व्यक्तीकडून अमलीपदार्थाचा व्यवहार केला जातो, अशी विश्वसनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार या पथकाने छापा टाकल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. रमेश चंद्रा (वय 28) याला ताब्यात घेण्यात आले. रमेश हा मुळ ओडिसा येथील आहे. त्याच्याकडून 5 किलो 395 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या गांजाची बाजारपेठेत अंदाजे 5 लाख 40 हजार रुपये इतकी किंमत आहे. ही कारवाई अँटी नार्कोटीक सेलचे पोलीस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक महेश गांवकर, पोलीस निरीक्षक सुदेश वेळीप, पोलीस निरीक्षक श्रीकांत नाईक आणि पोलीस उपनिरीक्षक विदेश पिळगावकर यांनी पार पाडली.
रविवारी सकाळी पाच वाजता रमेश चंद्रावर गुन्हा नोंदवण्यात आला. तसेच त्याची दोन दिवसाच्या पोलीस कोठडीसाठी रवानगी करण्यात आली आहे. प्रकरणाचा अधिक तपास अँटी नार्कोटीक सेलचे पोलीस उपनिरीक्षक प्रितेश मडगावकर करत आहेत.