पणजी - गोवा मुक्तीदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने देण्यात येणाऱ्या पोलीस, अग्निशमन दलासाठीच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. बालभवनतर्फे देण्यात येणारे गोमंत बालभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. हा कार्यक्रम पणजीत कांपाल मैदानावर सकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे.
ही आहेत नावे -
मुख्यमंत्री पोलिस सुवर्णपदकासठी गुरुदास गावडे (उपधीक्षक, डिचोली), विजयनाथ कवळेकर (पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग - कोलवा), सुरेंद्र कोमरपंत (उपनिरीक्षक, मडगाव), सुभाष नाईक ( सहाय्यक पोलिस निरीक्षक, कोकण रेल्वे), विल्सन फ्रेडी डिसोझा (सहायक निरिक्षक, पणजी), अबिना नोरोन्हा (महिला पोलीस, कळंगुट), दिलीप सिनारी (सहाय्यक निरिक्षक, फोंडा) यांची विनड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री साहस पुरस्कारासाठी राफायल आंतोनियो नोरोन्हा यांची निवड करण्यात आली आहे. 8 डिसेंबर 2017 ला एका बँकेवर दरोडा घालण्यासाठी आलेल्या सशस्त्र दरोडेखोराला पकडून त्याच्याकडून पिस्तूल हस्तगत केले होते. त्याचा साथीदार पकडला गेला होता. यामुळे बँक परिसरात जमलेल्या नागरिकांचे प्राण वाचले होते.
अग्निशमन दलाच्या सेवेसाठी मुख्यमंत्री पदकासाठी अशोक परब (उपधिकारी, म्हाटसा स्टेशन), सीताराम कामत (पणजी मुख्यालय वॉचरुम ऑपरेटर) आणि दीपक शेटगांवकर (जवान, पणजी मुख्यालय) यांची निवड करण्यात आली आहे. पोलिस स्थानकांमध्ये कुडचडे (प्रथम), म्हापसा (द्वितीय) आणि वास्को (त्रुतीय) ही सर्वोत्तम पोलिस स्थानके ठरली असून त्यांना अनुक्रमे ₹30 हजार, ₹20 हजार आणि ₹10 रोख रक्कम, फिरते चषक आणि प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे. या पुरस्कारांचे वितरण शनिवारी (दि. 19) सकाळी कांपाल मैदानावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येईल.
गोमंत बालभूषण निवड -
गोवा सरकारच्या बालभवनतर्फे देण्यात येणाऱ्या गोमंत बालभूषण 2020 ची घोषणा करण्यात आली. यासाठी शेकिन्हा रीबेका डिसोझा, उत्पल अरविंद सायनेकर, सोहम संतोष पागी, प्रीत हेमराज भाटी, आर्यन आत्माराम आरोलकर, रामचंद्र सदाशिव रेडकर आणि सहर्ष संतोष वायंगणकर यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे वितरण नंतर करण्यात येणार आहे. गोव्याचा हा हिरक महोत्सवी मुक्ती दिन आहे. यासाठी राज्य सरकारने वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्याची घोषणा केली आहे. याची सुरुवात शनिवारी (दि.19) संध्याकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याप्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. प्रथम आझाद मैदानावरील शहीद स्मारकास राष्ट्रपती पुष्पचक्र अर्पण करतील. त्यांतर जाहीर कार्यक्रमात गोमंतकीय जनतेला संबोधित करतील. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.