पणजी - कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी गोव्यात ज्या शंशयितांचे रक्तनमुने घेतले होते, त्यांचा आजपर्यंतचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आज दिवसभरात 13 जणांचे रक्त नमुने घेण्यात आले. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालय विलगीकरण कक्षात केवळ 6 संशयित रुग्ण आहेत.
गोवा सरकारच्या आरोग्य संचालनालयाने माध्यमाना दिलेल्या माहितीनुसार, गोव्यात 29 जानेवारीपासून कोविड-19 च्या संशयितांसाठी तपासणी सुरू केली. त्यांचे रक्तनमुने घेतले गेले. मात्र, आजपर्यंत प्राप्त झालेले सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत. मात्र, आज दिवसभरात 13 व्यक्तींचे नमुने घेतले गेले आहेत. ज्यामध्ये दक्षिण गोव्यातील मडगाव यूथील टीबी रुग्णालयामध्ये 8 तर उत्तर गोव्यातील बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालयात 5 जणांचे रक्त नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सध्या गोमेकॉमध्ये विलगीकरण कक्षात 6 संशयित रुग्ण आहेत.
गोव्याच्या दाबोळी विमानतळावर आतापर्यंत 16,915 जणांची तपासणी करण्यात आली आहे. घरातच विलगीकरण केलेले 647 संशयित प्रवाशी आहेत. मात्र, रुग्णलयात आतापर्यंत 36 जणांना अशाप्रकारे ठेवण्यात आले आहे. कोविड-19 च्या तपासणीसाठी आतापर्यंत 53 जणांचे नमुने पाठवले आहेत. त्यापैकी 40 जणांचे अहवाला प्राप्त झाले आहेत. जे सर्वच निगेटीव्ह आले आहेत. दरम्यान, जगभरात आतापर्यंत 2 लाख 92 हजार 142 जणांना लागण होऊन त्यापैकी 12 हजार 784 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात 23 राज्यांतून 402 जणांना बाधा झाल्याचे निश्चित झाले. ज्यामधील 7 जणांचा मृत्यू झाला. 23 जणांना इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. भारतातील विविध विमानतळावर आतापर्यंत 15 लाख 17 हजार 327 प्रवाशांची अशाप्रकारे तपासणी करण्यात आली आहे.