पणजी - पहिल्या टप्प्यात कोरोनामुक्त झालेल्या गोव्यात आता कोरोना रुग्णांची संख्या 300 वर गेली आहे. आज दिवसभरात गोव्यात 33 नवे कोरोनाबाधित रूग्ण सापडले. एकूण रुग्णसंख्येपैकी 235 रूग्ण अॅक्टिव आहेत.
आज दिवसभरात 2 हजार 337 जणांचे नमुने तपासणीकरता पाठवण्यात आले तर 1 हजार 887 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1 हजार 854 अहवाल निगेटीव्ह आले असून 33 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 1 हजार 301 अहवालांची अद्याप प्रतीक्षा आहे.
आज सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दक्षिण गोव्यातील मंगोरहिल-वास्को परिसरातील 30, दिल्लीहून विमानाने आलेला एक आणि महाराष्ट्रातून रस्ता मार्गे आलेल्या एका रुग्णाचा समावेश आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, 29 जानेवारी 2020 पासून आत्तापर्यंत 29 हजार 739 जणांचे नमुने तपासण्यात आले आहेत. त्यातील 28 हजार 438 अहवाल प्राप्त झाले. तर आत्तापर्यंत 65 रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.