पणजी- गोवा बोर्डाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे गोव्याबाहेर शेजारील राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सीमेवरील लगतची शाळा परीक्षा केंद्र म्हणून निवडली जाईल, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी दिली.
हेही वाचा- मुंबईत नवीन 692 कोरोनाग्रस्तांची नोंद, एकूण रुग्णसंख्या 11 हजारांच्या वर
भाजपच्या पणजीतील मध्यवर्ती कार्यालयात पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. मात्र, आजची बैठक ही नियमितप्रमाणे होती असे सांगून त्याविषयी अधिक माहिती देण्याचे टाळले.
यावेळी परीक्षेच्या नियोजनाविषयी विचारले असता डॉ.सावंत म्हणाले की, गोव्याबाहेरील विद्यार्थ्यांना कसे आणता येईल, याविषयी नियोजन सुरू आहे. सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांसाठी गोव्यातील जवळची सरकारी शाळा केंद्र म्हणून निवडली जाईल. तसेच यावेळी सामाजिक अंतर कटाक्षाने पाळले जाईल.
गोव्यातून कर्नाटकात जाण्यासाठी निघालेल्या मजुरांना कर्नाटक सरकारने प्रवेश नाकारला. यावर गोव्याची काय भूमिका आहे?, असे विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांना गावाकडून कागदपत्रांची छायांकित प्रत मागवून सादर करण्यास सांगितली आहे. त्याबरोबर हे मजूर येथे राहणे उद्योगासाठी आवश्यक आहे. ते जर नसतील तर अनेक उद्योग बंद होतील. त्यामुळे आम्ही कोणाला पाठवत नाही. ते जेथे राहत होते तेथेच त्यांना राहू द्यावे.
दरम्यान, विदेशातून गोमंतकीयांना परत येण्यासाठी विमानतळावर चार्टर उतरविण्यासाठी केंद्राकडे परवानगी मागितली आहे. ती लवकरच मिळेल. विदेशातून आणण्याचे नियोजन आणि वेळापत्रक परराष्ट्र व्यवहार खाते ठरवत असते.
तसेच गोव्यातून दुसऱ्या राज्यात मजुरांना घेऊन जाणाऱ्या रेल्वेला अजून परवानगी मिळालेली नाही. ती मिळताच हजारांहून अधिक मजुरांना मध्यप्रदेशात रवाना करण्यात येईल, असेही सावंत यांनी सांगितले.