नवी मुंबई - देशातील पहिल्या महिला तेजस्विनी बस सेवेचा शुभारंभ शुक्रवारी नवी मुंबई महापालिकेने केला. ज्यामध्ये फक्त महिला प्रवाशांना प्रवेश असून यामध्ये चालक वाहक ही महिलाच असणार आहेत. एकीकडे या योजनेचे स्वागत सगळ्या स्तरातून करण्यात येत असले तरी दुसरीकडे मात्र याच परिवहन सेवेतील महिला बस चालक आणि वाहक रोजंदारीवर काम करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेने शुक्रवारी मोठ्या दिमाखात देशातील पहिल्या तेजस्विनी महिला बस सेवेचे उदघाटन केले. या बसच्या चालक वाहक ही महिला असणार आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना रोजगार ही उपलब्ध होणार असून प्रवासात महिला सुरक्षिततेचा प्रश्न ही मार्गी लागणार आहे. यासाठी महापालिकेने भरती प्रक्रिया देखील सुरू केली. भरती झालेल्या महिलांना मोठी आश्वासने देखील पालिकेकडून देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात आज महिला दिनीच महापालिकेची धक्कादायक बाब समोर आली आहे.
कायमस्वरूपी किंवा ठोक मानधनावर कामावर न घेता रोजंदारीवर या महिला चालक व वाहकास कामावर घेतले आहे. २६ महिला बस चालकांची आवश्यकता असताना फक्त 2 महिला चालक महापालिकेकडे आहेत. त्यामुळे भविष्यात या महिला विशेष बस आता पुरुष चालकांकडून चालवण्याची नामुष्की महापालिकेवर येणार असल्याची चिन्ह आहेत.