नाशिक- राज्याच्या सीमा भागात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा विस्तार करणार असल्याचं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाला भेट दिल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सामंत बोलत होते. भारतात जिथे मराठी माणूस आहे त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू करण्याचा मानस असून, गोव्यातील मराठी माणसांसाठी या विद्यापीठाचे उपक्रेंद्र सुरू करणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.
पुण्यात देखील विद्यापीठाचा विस्तार होणार आहे. त्यासाठी 2 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. नागपूरमध्ये देखील विद्यापीठाचा विस्तार होणार असल्याची माहिती यावेळी सामंत यांनी दिली. मुक्त विद्यापीठाच्या बी एस्सी ऍग्रीकल्चरच्या कोर्ससाठी लवकरच कॅबिनेटमध्ये प्रस्ताव सादर करणार आहे. तसेच ही पदवी पूर्ण केल्यानंतर युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास यावेळी सामंत यांनी व्यक्त केला आहे.
सातव्या वेतन आयोगाबाबत लवकरच निर्णय
दरम्यान मुक्त विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. तसेच पात्र नसलेल्या प्राध्यापकांचा शोध घेऊन त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. कॉलेज सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असून, जात प्रमाणपत्र वेळेवर मिळाले नाही तर पावती सादर केली तरी महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार असल्याचे सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच विद्यापीठांच्या वेबसाईटची सायबर चोरीं रोखण्यासाठी, राज्यातील सर्व विद्यापीठांचे सायबर ऑडिट करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.