नाशिक - येथील नाशिकरोड परिसरातील अष्टेकर ज्वेलर्समध्ये गुरुवारी चोरीची घटना समोर आली आहे. दागिने घेण्याच्या बहाण्याने आलेल्या महिलेनेच कर्मचाऱ्यांची नजर चुकवून 2 लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी लंपास केली आहे. दरम्यान, ही चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
नाशिक रोडवरील अष्टेकर ज्वेलर्समध्ये चोरी
सराफ बाजारातून 20 लाख रुपयांची बॅग चोरून नेल्याची घटना ताजी असताना नाशिक रोड भागात सोन्याची चेन विकत घेण्याच्या बहाण्याने 2 लाखांची सोनसाखळी एका महिलेने चोरून नेल्याची घटना दुपारी उघडकीस आली आहे. नाशिकरोडच्या अष्टेकर ज्वेलर्समधील ही घटना असून, एक महिला सोन्याची चेन खरेदी करण्याच्या उद्देशाने अष्टेकर ज्वेलर्समध्ये आली आणि सेल्समनाला बोलण्याच्या नादात गुंतवून सोनसाखळी लंपास केली. मात्र, स्कार्फधारी महिलेची हातचलाखी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
सराफा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
दरम्यान, सोनसाखळी उचलून स्कार्फमध्ये लपवून महिलेने आपल्या इतर साथीदारांसह पोबारा केला आहे. चोरी करणाऱ्या महिलेसह अन्य एक महिला आणि 2 पुरुष देखील सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. दुकानातील कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतवून सोन्याचे दागिने चोरणारी टोळी शहरात सक्रिय झाल्याची चर्चा असून, सराफ व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, ऐन दिवाळीच्या तोंडावर चोरीच्या घटना वाढल्याने सराफा व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.