नाशिक - जगभरात प्रसिद्ध असलेल्या नाशिकच्या वाइनची केंद्र सरकारने दखल घेतली असून. वाइनला आता नाशिक जिल्ह्याचे उत्पादन म्हणून उद्योग विभागातर्फे घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे वाइन क्षेत्राला प्रोत्साहन मिळणार आहे आणि नाशिकच्या वाइनला जागतिक ओळखही प्राप्त होणार आहे.
केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत उद्योग मंत्रालयाच्या वतीने 'वन डिस्टिक वन प्रॉडक्ट' हा नवीन उपक्रम सुरु करण्यात आला असून त्यानुसार विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्पादित होणाऱ्या शेती अथवा औद्योगिक उत्पादनांना जागतिक पातळीवर ओळख मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार आहे. यात नाशिकच्या वाइनचा समावेश करण्यात आला असून यामुळे नाशिकच्या वाइनची जागतिक पातळीवर ओळख निर्माण होणार आहे.
भारतात सर्वाधिक द्राक्ष उत्पादन नाशिक जिल्ह्यात होत असल्याने नाशिकला ग्रेप्स सिटी म्हणून देखील ओळखलं जातं आणि याच द्राक्षापासून नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाइनची निर्मिती देखील केली जाते. नाशिकमध्ये 20 हून अधिक वाइन निर्मिती उद्योग असून यातील अनेक वाइनने जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे. केंद्र सरकारने नाशिक जिल्हा हा वाइन उत्पादक जिल्हा म्हणून घोषित केल्याने वाइन क्षेत्राला यामुळे चालना मिळणार आहे.
वाइन उद्योगाला मिळेल चालना -
सरकारकडून वाइन उद्योग निर्मितीसाठी अनुदान दिले जात असल्याने नाशिक जिल्ह्यात 7 ते 8 वर्षांपूर्वी भारतात सर्वधिक 40 वाइन निर्मिती उद्योग सुरू झाले होते. मात्र या ना त्या कारणाने आणि योग्य मार्केटिंग न झाल्याने अनेक वाइन उद्योग बंद पडले. सध्या जिल्ह्यात 20 वाइन निर्मिती उद्योग सुरू आहेत. सरकारने नाशिकच्या वाइन उद्योगाला चालना देण्यासाठी नवीन योजना आणणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं.
वाइनला सरकारने दारूतून वगळावे -
वाइन ही योग्य प्रमाणात घेतल्यास आरोग्यासाठी लाभदायक असून सरकारकारने वादन उद्योगाला चालना देण्यासाठी वाइन ही दारूच्या श्रेणीतून वगळावी, अशी मागणी वाइन उद्योग चालकांनी केली आहे. तसेच अनेक वाइन निर्मिती उद्योग हे ग्रामीण भागात असून तेथे चांगले रस्ते, लाईट आणि मुबलक पाणी नसल्याने वाइन उद्योग करताना अडचणी निर्माण होत असून सरकारने वाइन उद्योगाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी पायाभूत सुविधा उभाराव्या अशी मागणी वाइन उद्योग संस्थानी केली आहे.