नाशिक - सिन्नरच्या वावी परिसरात कार चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. येथील धनंजय दोडे यांच्या मालकीची ही कार आहे. हा प्रकार गुरुवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास घडला. दरम्यान, या चोरांचा कार चोरतानाचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
दाराचे लॉक तोडले
सिन्नर तालुक्यातील वावीच्या मेन रोडवर दुकानासमोर उभी केलेली (इको कार. एम.एच 15/2067) कार चोरी झाल्याची घटना घडली आहे. वावी येथील भांडी व्यापारी धनंजय दोडे यांच्या मालकीची ही कार आहे. चोरट्यांनी कारचा दरवाजाचे लॉक तोडून गाडी चोरण्याचा प्रयत्न केला. गाडी चालू होण्याचा आवाज होऊ नये, म्हणून चोरांनी शक्कल लढवत, गाडी ढकलत पुढे नेली. दरम्यान, चोरी केल्याचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
'पोलीस चोर पकडण्यात अपयशी'
कार चोरी झाल्याचे निदर्शनास येताच, दोडे यांनी स्थानिक पोलिसांना या बाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळल्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. वावी पोलीस स्टेशनच्या परिसरात चोरीचे सध्या सत्र सुरू आहे. मात्र, अद्यापपर्यंत पोलिसांकडून कुठल्याही प्रकारची दखल किंवा चोरांना पकडण्यात आले नाही, असा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, वावी पोलिसांनी वाढत्या चोऱ्यांच्या घटना थांबण्यासाठी चोरांना ताब्यात घेतले पाहिजे अशी मागणी नागरिक करत आहेत.