नाशिक - रविवार पेठेतील घनकर लेनमध्ये असलेला वैश्य वाडा कोसळला. या ढिगाऱ्याखाली कोसळून दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. वडील व मुलाला दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात महापालिकेच्या अग्निशमन दलाला यश आले आहे. ही घटना शनिवार (दि. 3 जुलै) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.
महिला वाड्याच्या भिंतीसोबत दुसऱ्या मजल्यावरून खाली सुरू असलेल्या खोदकामाच्या खोल खड्ड्यात पडल्या
रविवार पेठ येथील घनकर लेनमध्ये असलेल्या वैश्य वाड्याच्या बाजूला सुरू असलेल्या बांधकामांमुळे या वाड्याची एक बाजू कमजोर झाली होती. ती बाजू शनिवारी (दि. 3 जुलै) संध्याकाळी अचानक कोसळली. या दुर्घटनेत दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. या दोन्ही महिला वाड्याच्या भिंतीसोबत दुसऱ्या मजल्यावरून खाली सुरू असलेल्या खोदकामाच्या खोल खड्ड्यात पडल्या होत्या. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना तत्काळ मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढले. त्यानंतर त्या दोघांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या वाड्यात अडकलेला एक पाच वर्षांचा मुलगा आणि त्याच्या वडिलांना बाहेर काढण्यास अग्निशामक दलाच्या जवानांना यश मिळाले. या वाड्याच्या पाठीमागे संजय जोशी यांच्या वाड्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू होते. त्याचे हादरे बसून वैश्य वाडा कोसळल्याचे राहिवाशांनी आणि अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
वाड्याच्या आजूबाजूला असलेल्या पाच वाड्यातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले
वाडा पडल्याच्या दुर्घटनेत संगीता अजित वैश्य (वय 55 वर्षे) व रिता अभिषेक वैश्य (वय 27 वर्षे) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येते आहे. या शिवाय कोसळलेल्या वाड्याच्या आजूबाजूला असलेले पाच वाडे आणि या वाड्यांमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या प्रकरणी अनाधिकृतपणे वाड्याचे पुन्हा बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यवसायका विरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. या संपूर्ण परिसरातील नागरिकांना त्या भागात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
हेही वाचा - डेल्टा प्लसविषयी गाफील राहू नका - मुख्य सचिव सीताराम कुंटे