नाशिक - नाशकात किन्नर बांधवांकडून कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आली. नाशिकमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी व्हावा, यासाठी किन्नर बांधव रस्त्यावर उतरले असून कोरोनावर आधारित गीते म्हणत जनजागृती केली. त्यांच्या या उपक्रमाला समाज बांधवांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सध्या होळीचा सण जवळ आला असून होळी सणाचे औचित्य साधून किन्नर बांधव बाजारपेठामध्ये फिरत आहेत. मात्र यंदा नाशिकमध्ये कोरोनाचे सावट असून कोरोना प्रादुर्भाव कमी व्हावा, यासाठी शहरातल्या बाजारपेठांमध्ये किन्नर बांधव सध्या 'मास्क वापरा, कोरोनापासून मुक्त रहा' असा संदेश देत आहेत. या संदेशावर आधारीत त्यांनी काही गाणीही तयार केली आहेत. नाशिक रोड येथील अण्णा हजारे मार्ग येथे काही किन्नर बांधवांनी आज कोरोना विषयक जनजागृती केली. व्यापारी, नोकरदार, व्यावसायिक, भाजीविक्रेते यांना मास्क वापरण्याचे आवाहन केले.
- नाशिक जिल्ह्यात मागील 15 दिवसापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून मागील पाच दिवसापासून दररोज नाशिक जिल्ह्यात 2,500 नवीन रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून नागरिकांनी मास्क वापरावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने वारंवार केले जात आहे. आज नाशिक जिल्ह्यात 16 हजाराहून अधिक कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत.
-नाशिक जिल्ह्यातील कोरोनाचा अहवाल.
-1 लाख 50 हजार 917 कोरोनाबाधित
-1 लाख 31 हजार 698 रुग्ण कोरोनामुक्त.
-16 हजार 987 रुग्णांवर उपचार सुरू
-2हजार 232 रुग्णांचा मृत्यू झाला
-जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 87.27 इतके आहे.