नाशिक - पोलीस अकादमीत प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांना झिंगाट डान्स चांगलाच भोवणार असल्याचे दिसत आहे. अकादमीच्या संचालक अश्वती दोर्जे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत त्यांची चौकशी सुरू केली असून दोषींवर विभागीय कारवाई केली जाणार आहे.
टीकेनंतर दखल घेत चौकशीचे आदेश दिले -
महाराष्ट्र पोलीस अकादमीतील उपनिरिक्षकांचा झिंगाट डान्सचा व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर चर्चेचा विषय ठरला होता. कोरोना संसर्गाचा धोका असताना भावी पोलीस उपनिरीक्षकच सोशल डिस्टंसिंगचा नियम फाटयावर ठेवून ऐवढया मोठया संख्यने एकत्र जमून डान्स कसे करु शकतात, याबाबत टीका होत होती. अखेर संचालक अश्वती दोर्जे यानी या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. याबाबत त्यांनी लेखी पत्र जारी केले असून सदर प्रकरणी भूमिका मांडली आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी होणार असल्याने प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक तुकडीचे धाबे दणाणले आहेत.
अटी-शर्ती लावून कार्यक्रमाला परवानगी दिली होती -
महाराष्ट्र पोलीस अकॅडमी अकॅडमीत पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षणार्थी कोरोना लसीकरणाचे दोन डोस पुर्ण घेतले असून त्यांना कार्यक्रमास परवानगी दिली होती. उपनिरीक्षकांनी लवकर कामावर रुजू होण्यासाठी ही सर्व प्रक्रिया करणे गरजेचे असते. यामुळेच अटी-शर्ती लावून कार्यक्रमाला परवानगी दिली होती. व्हायरल व्हिडीओची चौकशी चालू आहे. या प्रकरणी महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या संचालक आणि पोलीस आयुक्त दिपक पांडेय याच्याशी चर्चा केली असून लवकर या प्रकरणात चौकशीचा अहवाल पोलीस आयुक्तांना अकॅडमीच्या संचालक देणार त्यानंतर पुढची कारवाई निश्चित केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी सांगितले आहे.