नाशिक : टोमॅटो उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्राने पुढाकार घेत एमआयएस योजनेच्या माध्यमातून राज्यांनी टोमॅटोची खरेदी केल्यास 50 टक्के भार केंद्राकडून उचलण्याची तयारी दर्शविल्याचे केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी सांगितले आहे. एमआयएस योजनेच्या माध्यमातून राज्यांनी टोमॅटोची खरेदी केली तर होणाऱ्या नुकसानीतील पन्नास टक्के वाटा केंद्राकडून उचलला जाईल असे त्यांनी सांगितले. टोमॅटोचे दर कोसळल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्राने हा निर्णय घेतला आहे.
राज्याने प्रस्ताव पाठवावा
देशभरात टोमॅटोचे भाव कोसळले असून शेतकरी रस्त्यावर आपला माल फेकत आहे. यावर तोडगा म्हणून जिथे टोमॅटोचे भाव कमी आहे, तिथे एमआयएस स्कीम राबवण्याचे नोटिफिकेशन केंद्र सरकारने काढले आहे. यानुसार राज्यांनी खरेदी केलेल्या मालाच्या नुकसानीत केंद्र सरकार ५० टक्के वाटा उचलणार आहे. याबाबत राज्यांनी तत्काळ प्रस्ताव पाठवावा असे आवाहन केंद्राने केल्याची माहिती केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी दिली. या निर्णयामुळे टोमॅटो उत्पादक शेतकर्यांना काही अंशी दिलासा मिळू शकतो असे बोलले जात आहे.
डॉ. भारती पवार यांचा पुढाकार
टोमॅटोची वाढलेली आवक आणि कोसळलेले दर पाहता केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याशी संपर्क साधला. नाशिकमधील टोमॅटो उत्पादकांना बाजार समितीत रस्त्यावर टोमॅटो फेकण्याची वेळ आल्याचे त्यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर कृषीमंत्री तोमर यांनी याप्रश्नी तोडगा काढण्याचे मान्य केले. राज्य सरकारने केंद्राला विनंती केल्यास बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत राज्य सरकारला टोमॅटो खरेदी करावी लागेल आणि त्यासाठी खर्चाचा भार केंद्र व राज्याने अर्धा-अर्धा उचलावा अशा सूचना करण्यात आल्या आहेत. हा निर्णय झाला असून त्यासाठी राज्याने केंद्राला तत्काळ प्रस्ताव पाठवावा असे भारती पवार यांनी म्हटले आहे.
हे धोरण शेतकऱ्यांसाठी
केंद्राने तात्काळ हा निर्णय घेतला आहे. आवक वाढल्याने टोमॅटोचे दर खूप कमी झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसतो. जिथे दर कमी झाले तिथे एमआयएस (मार्केट इम्प्रुमेंटल स्किम) नोटिफिकेशन केंद्र सरकारने जारी केले आहे. केंद्राने तसे पत्र राज्य सरकारला दिले आहे. राज्याने तत्काळ यासंबंधी प्रस्ताव केंद्राला पाठवावा असे पवार यावेळी म्हणाल्या. केंद्राचे धोरण शेतकऱ्याच्या फायद्याचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
हा शेतकऱ्यांना वेड्यात काढण्याचा धंदा - जगताप
टोमॅटोसाठी एमआयएस म्हणजे शेतकऱ्यांना वेड्यात काढण्याचा धंदा आहे अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी केली आहे. त्याऐवजी केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी प्रत्येक 10 रूपये असे एकूण दोघांनी मिळून 20 रुपये प्रती किलो मदत शेतकऱ्याच्या थेट अकाउंटवर जमा करावी. एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्य सरकार टोमॅटो खरेदी करून तो कुठे टाकणार? त्यापेक्षा ज्या मार्केट कमिटीत टोमॅटो विकला गेला आहे त्या शेतकऱ्यांची यादी घेऊन थेट त्यांच्या अकाउंटवर पैसे टाकण्यात यावे अशी मागणी जगताप यांनी केली आहे.
हेही वाचा - राज्यातील चार जिल्हा बँका तोट्यात, राज्य सरकारने 'या' बँकांच्या निवडणुका ढकलल्या पुढे