नाशिक - निफाड शहरातील गणेश नगर परिसरात अज्ञात दुचाकीस्वरांनी गणेश नगर येथे राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि डोरले ओरबाडत धूम ठोकली असल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबत निफाड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निफाड पोलिसांत गुन्हा
निफाड शहरातील गणेश नगर येथील जास्वंद क्लिनिकसमोर शनिवारी दुपारी 1 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास डॉक्टर महेंद्र कुलकर्णी आणि त्यांच्या आई पायी जात असताना अज्ञात दोन चोरट्यांनी दुचाकीवर येऊन महेंद्र कुलकर्णी यांच्या आईच्या गळ्यातील साठ हजार रुपये किंमतीचे एक तोळे वजनाची सोन्याची चेन आणि हिरे लावलेले पांढरे डोरले बळजबरीने ओढून नेले. सोने चोरून नेल्याने सदरचा गुन्हा निफाड पोलिसांत दाखल झाला असून पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवार हे अधिक तपास करत आहेत.
महिलावर्गांत भीतीचे वातावरण
गेल्या आठवड्यात अशीच दागिने लांबवल्याची घटना निफाड शहरात घडली होती. पुन्हा अज्ञात दुचाकीस्वारांनी दागिने लांबविले. यामुळे महिलावर्गांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दागिने चोरणारे सीसीटीव्हीत दिसत असून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी होत आहे.