नाशिक - भाजीपाला खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेल्या अशोका मार्गावरील एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून पळ काढल्याची घटना बुधवारी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'सीसीटीव्ही'त कैद
नाशिक शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सोनसाखळी चोरांनी धुमाकूळ घातला आहे. दिवसागणिक शहरातील विविध भागांमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. असाच सोनसाखळी चोरीचा प्रकार नाशिकच्या अशोका मार्ग परिसरांमध्ये बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडला. बुधवारी सायंकाळी आपल्या मुलीसोबत भाजी खरेदीसाठी गेलेल्या मीनाक्षी साळुंखे या महिलेच्या गळ्यातील जवळपास 23 ग्रॅम वजनाची सोनसाखळी पाठीमागून आलेल्या दोघा दुचाकीस्वारांनी ओरबाडून नेली. संपूर्ण घटना ही परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरॅमध्ये कैद झाली असून यात धक्कादायक बाब म्हणजे स्मार्ट पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर हा सोनसाखळी चोरीचा प्रकार घडला आहे.
97वी घटना
याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञात चोरट्यांनी विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र स्मार्ट पोलीस चौकीच्या परिसरात ही घटना घडल्याने स्मार्ट पोलिसिंगबाबत आता संशय व्यक्त केला जात आहे. तर या पोलीस चौकीमधील दूरध्वनीदेखील बंद असल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त करत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वर्षभरातील सोनसाखळी चोरीची ही शहरातील 97वी घटना असून आता पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देउन उपाययोजना कराव्या, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.