नाशिक - उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेनेचा एक सदस्य निवडीसाठी आयोजित केलेल्या ऑनलाइन महासभेत महापौर सतीश कुलकर्णी यांनी शिवसेनेच्या सदस्यासह स्थायी समितीच्या सोळा सदस्यांची निवड घोषित केली आहे.
स्थायी समितीची निवडणूक रंगतदार होणार
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीच्या सर्वच 16 सदस्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाची महापौरांनी अंमलबजावणी केली आहे. तौलनिक संख्या बळाच्या आधारे महापौरांनी सदस्य जाहीर केले आहेत. या संख्येनुसार आता भाजपा - 8, शिवसेना - 5, काँग्रेस -1, राष्ट्रवादी -1, मनसे - 1 अशी सदस्य संख्या असणार आहे.
मनसे किंगमेकर?
महापौरांनी केलेल्या या नियुक्तीमुळे आता नाशिक महापालिकेची येणारी स्थायी समितीची निवडणूक रंगतदार होणार अशी शक्यता आहे. दरम्यान, भाजपा आणि महाविकास आघाडीची संख्या सारखीच असल्याने मनसे ज्याच्या पारड्यात वजन टाकेल त्याचाच सभापती होणार असल्याने स्थायीच्या या निवडणुकीत मनसे किंगमेकर ठरणार आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार भाजपाचा एक सदस्य कमी
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भाजपाचा एक सदस्य कमी झाला असून शिवसेनेचा एक सदस्य वाढला आहे. असे असले तरी स्थायी समितीत समसमान संख्या झाल्याने सभापतीपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. मनसेचे सदस्य कुणाच्या पारड्यात मतदान करणार, यावर मोठे गणित अवलंबून आहे, असे असले तरी वेळेवर काय घडामोडी घडतात यावरच सभापतीपदाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.