नाशिक - शहरातील भारतनगर भागात गेल्या मंगळवारी (30 जून) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे. घरमालकाने भाडेकरुन महिलेला जिवंत जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. मृत महिलेने मृत्यूपूर्वी कार्यकारी दंडाधिकारी यांना दिलेल्या जबाबानंतर घरमालकासह 4 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरमालक व त्याचे नातलग घरभाडे घेण्यासाठी गेले असता, त्यावरून भाडेकरु महिला व घरमालक यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर भाडेकरू महिलेला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मृत महिला आयेशा शेख (वय 18 वर्ष) यांनी दिलेल्या जबाबानुसार, पती असिम व मुलगा यांच्यासह त्या नाशिकच्या भारतनगरमध्ये भाड्याच्या घरात राहतात. गेल्या काही महिन्यांपासून घरभाडे थकले होते. त्याबाबत घरमालकाकडून तगादा सुरू होता. गेल्या मंगळवारी (30 जून ) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास संशयित घरभाडे घेण्यासाठी गेले असता त्यावरून बाचाबाची झाली. त्यावेळी संशयित बबू,अश्रफ व राणी यांनी आयेशा शेख हिच्या अंगावर रॉकेल टाकून जाळल्याची माहिती आयेशाने कार्यकारी दंडाधिकारी हेमंत पोटिंदे यांना दिली.
या घटनेत गंभीररित्या भाजलेल्या आयेशाला तिचे पती असिम यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान, बुधवारी (1 जुलै) रात्री तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी बबू, अश्रम बाबुलाल शेख (32, रा. शिवाजीवाडी, भारतनगर), राणी, अमन अशी संशयितांची नावे असून, त्यांच्याविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत हे करीत आहेत.