नाशिक - निवडणूक आदर्श आचारसंहितेत दारुचे प्रलोभन देणे गुन्हा असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारुवर करडी नजर ठेवली आहे. या नियमाची अंमलबजावणी करत जिल्ह्यात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या १५१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाने १७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर १० मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक म्हटले की उमेदवार निवडून येण्यासाठी मतदारांना पैसे,पार्ट्या,दारू अशा वेगवेगळ्या मार्गाने प्रलोभने दाखविली जातात.
राज्य उत्पादन शुल्काची कारवाईसाठी पथके कार्यरत
अवैध दारुला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने चार पथकांची निर्मिती केली आहे. तर दोन विशेष पथके नेमण्यात आली आहेत. या पथकांनी अनधिकृत हॉटेल आणि ढाबे यांची तपासणी करून कारवाई केली आहे. तसेच विना परवानगी मद्याच्या पार्टीवरदेखील कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तपासणीसाठी चेक पोस्टची निर्मिती -
जिल्ह्यात दोन हद्दीवर तात्पुरती स्वरुपाच्या चेक पोस्टची निर्मिती करण्यात आली आहे. त्या ठिकाणी संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. निवडणुकीत तळीरामांवर राज्य उत्पादन विभागाची करडी नजर राहणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी सांगितले.