नाशिक - राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी), नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) यांना विरोध करण्यासाठी आणि देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था, याकडे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून शुक्रवारी (२४ जाने.) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हेही वाचा... घाटकोपरमध्ये वंचितच्या महाराष्ट्र बंदला उस्फूर्त प्रतिसाद तर कुर्ल्यात हिंसक वळण
वंचितकडून होत असलेल्या या महाराष्ट्र बंदला नाशिक जिल्ह्यात चांगलाच प्रतिसाद मिळाला. नांदगांव आणि मनमाडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.
'देशात एनआरसी आणि सीएए विरोधात प्रचंड रोष आहे. सरकार दडपशाही करून हा कायदा लागू करू पाहत आहे. तर दुसरीकडे देशाची अर्थव्यवस्था तळाला गेली आहे. जीएसटी, नोटबंदी आणि गैर विश्वासाचे वातावरण यामुळे सरकारला निधी येत नाही. देशाची दिवाळखोरीकडे वाटचाल सुरू आहे. या सगळ्याला सरकार जबाबदार असून त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंद पुकारण्यात येत आहे' असे प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगितले होते.
हेही वाचा... होय हिंदूच..! पाकिस्तानी मुस्लिमांना हाकलण्यासाठी ९ फेब्रुवारीला मोर्चा काढणार
प्रकाश आंबेडकरांच्या आवाहनाला मनमाड तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. मनमाड शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. व्यापारी वर्गानेही स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होत पाठींबा दिला. तसेच बाजार समिती देखील बंद होती. आंदोलकांकडून यावेळी नगरपालिका प्रवेशद्वारासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. अनेक सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी या बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते राजेंद्र पगारे, पी. आर. निळे, यशवंत बागुल, उमेश भालेराव आदि नेते आणिल कार्यकर्ते उपस्थित होते