नाशिक - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यातील आदिवासी बांधवांसाठी 485 कोटींची खावटी योजना जाहीर केली. मात्र, कित्येक महिने उलटूनही आदिवासी बांधवांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याने आज श्रमजीवी संघटनेतर्फे आदिवासी विकास भवनासमोर आदिवासी खात्याचे तेरावे घालून आंदोलन करण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी काळामध्ये आदिवासी बांधवांचे हाल होऊ नये म्हणून राज्य शासनाच्यावतीने राज्यातील आदिवासी बांधवांसाठी 485 कोटी रुपयांची खावटी योजना जाहीर करण्यात आली. मात्र, कित्येक महिने उलटून देखील त्याचा लाभ मिळत नसल्याने आदिवासी बांधवांना या योजनेचा लाभ मिळत नाही. तर, संचारबंदी काळामध्ये केंद्र शासनाने आदिवासींसाठी मोफत धान्याची व्यवस्था केली. मात्र, गेल्या सहा महिन्यात संबंधीत खात्यामार्फत कोणालाही धान्यपुरवठा करण्यात आला नाही. यामुळे आदिवासी बांधवांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. यामुळे संतप्त झालेल्या श्रमजीवी संघटनेच्यावतीने मंगळवारी नाशिकच्या आदिवासी आयुक्त कार्यालयाबाहेर संबंधीत खात्याचे तेरावे घालून अनोखे आंदोलन केले आहे.
यावेळी जोरदार घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आले आहे. तर, गेल्या 6 महिन्यांपासून अन्न, धान्य, मीठ पुरवठा होत असल्याचा सरकारचा दावा फक्त कागदावरच असल्याचा आरोपदेखील यावेळी करण्यात आला.
आदिवासी बांधवांना शासनाने जाहीर केलेल्या खावटी योजनेचा लाभ कधी मिळणार? असा संतप्त सवाल आंदोलकांकडून करण्यात आला. लवकरात लवकर हा लाभ आदिवासी बांधवांना देण्यात यावा, अशी मागणी देखील यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली आहे.