नाशिक- लोकसभा निवडणुकीनंतर विरोधक आहे का? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारत विरोधकांवर टिकास्र सोडले. तसेच काही पक्षांना देशात आणि राज्यात अध्यक्ष मिळत नाही. त्यामुळे त्यांनी 'अध्यक्ष पाहिजे' अशी जाहिरात दिली आहे, अशी बोचरी टीका राऊत यांनी केली. उरलेले काही पक्ष येत्या दहा पंधरा दिवसात शिवसेना, भाजपमध्ये विलीन होतील, असे संकेतही शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले आहेत. ते नाशिक येथे ईटीव्ही भारतशी बोलत होते.
शेतकरी नेते राजू शेट्टींवर टीका करताना राऊत म्हणाले, की राजू शेट्टी यांनी स्वतः आंदोलन करावे. राजू शेट्टींना लोकसभेत जनतेने घरी पाठवले आहे. त्यांनी हे विसरू नये. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची काहीही डोकदुखी होणार नाही, असेही राऊत यावेळी म्हणाले.
'ते' मुंबई आले होते, पाकिस्तानमध्ये नाही
कनार्टकमधील बंडखोर आमदार महाराष्ट्रात आल्या संदर्भात राऊत यांना विचाले असता ते म्हणाले, की महाराष्ट्रातील आमदारही यापूर्वी काही प्रसंगी कर्नाटकमध्ये राहिले आहेत. त्यामुळे कर्नाटकमधील आमदार मुंबईत आले असतील तर ते मुंबईत आहेत, पाकिस्तानमध्ये नाहीत. असे राऊत म्हणाले. तसेच त्या आमदारांना महाराष्ट्राची संस्कृती समजून घेता येईल. त्यामुळे त्यांना महाराष्ट्राच्या बेळगावच्या सीमाप्रश्नाची जाणीव होईल. सीमा भागातील जो सातत्याने प्रश्न सुरू आहे त्या संदर्भात एक चांगला निर्णय घेतील, असे राऊत म्हणाले.
राहूल गांधींनी आत्मचिंतन करावे
काँग्रेसमधून आमदार का फुटत आहेत तसेच कर्नाटकमधील सरकार का अस्थिर आहे, याचे आत्मचिंतन राहुल गांधी यांनी करायला हवे. तसेच स्वतः राहुल गांधी यांनीच पलायन केले असून त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार नाही, असेही राऊत म्हणाले.
कोपर्डीची घटना अत्यंत घृणास्पद
कोपर्डी घटनेला तीन वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर राऊत म्हणाले की, कोपर्डीची घटना अत्यंत घृणास्पद होती. या घटनेनंतर सर्व राजकीय पक्षांना आरोपींच्या पिंजर्यात उभे राहावे लागले होते. आता आश्वासनंतर पीडित मुलीच्या आईवडिलांनी काही प्रश्न उपस्थित केले असतील, तर सरकारला त्याचे उत्तर द्यावे लागेल, असे राऊत म्हणाले.
धोनी शिवसेनेत येणार असल्याची माहिती....
महेंद्रसिंह धोनी भाजपमध्ये जाणार का? या प्रश्नावर राऊत म्हणाले, की मला कोणी तरी म्हटले धोनी शिवसेनेत येणार आहे. माझ्याकडे अशी माहिती आहे की त्यांना शिवसेनत यायचे आहे. महेंद्रसिंह धोनी सारख्या संवेदनशील व्यक्तिमत्वाचे राजकारणात स्वागत केले पाहिजे. खेळाडू , सैनिक आणि कलावंतांना शक्यतो कुठल्याही वादातमध्ये ओढू नये, असे ही राऊत म्हणालेत.