नाशिक - पाकिस्तानातून आपल्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी आलेली मूकबधीर गीता आता नाशिकला पोहचली आहे. नाशिकच्या एकलहरा भागात राहणाऱ्या रमेश सोळसे यांनी गीता आपली मुलगी असल्याचा दावा केला आहे. लहानपणी तिच्या आईने गीताला रेल्वेत सोडून दिल्याचे रमेश यांचे म्हणणे आहे. गीता ही नाशिकरोड मार्गाने दिल्ली आणि नंतर लाहोरला पोहचली असल्याचा अंदाज रमेश यांनी व्यक्त केला. यावेळी रमेश यांनी गीताचा जन्मदाखला दाखवत गीताला गावाची ओळख पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, गीता हिचे समाधान झाले नाही.
आपले घर हे रेल्वेस्थानकाच्या बाजूला मंदिर आणि नदीच्या आसपास असल्याचे गीता हिचे म्हणणं आहे. तसेच शेतामध्ये ऊस आणि भुईमुगाचे पीक असल्याचे वर्णन गीता करत आहे.
रमेश सोळसे यांचा डीएनए निगेटिव्ह
रमेश सोळसे यांनी याआधी देखील गीता आपली मुलगी असल्याचा दावा केला होता. तेव्हा त्यांचा डीएनए निगेटिव्ह आला होता. मात्र, माझ्या पत्नीचा डीएनए तपासावा असे रमेश यांचे म्हणणं आहे.
गीता पोलीस ठाण्यात दाखल
रमेश सोळसे करत असलेला दावा खरा आहे का हे तपासण्यासाठी गीता व सामाजिक कार्यकर्ते नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. यावेळी पोलीस निरीक्षक एस वाय बीजली यांनी सत्यता तपासण्यासाठी रमेश यांच्या पत्नीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. रमेश सोळसे यांची पत्नी असलेल्या शोभा यांनी दुसरा विवाह केला असून, त्या गीतासमोर आल्याने सत्य समोर येणार आहे.
गीताचे हावभाव आणि इशाऱयावरून तिच्या कुटुंबाचा घेतला जातोय शोध
अधिकाऱयांनी सांगितले की, गीताच्या नाकाला उजवीकडे छिद्र केले आहे. त्यानुसार मूकबधीर महिलांच्या मते तिच्या मूळ गावाजवळ ऊस, तांदूळ आणि शेंगदाण्याचे पीक घेतले जात असावीत. दरम्यान, गीता ही तेलुगू चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता महेश बाबूची प्रशंसक आहे. गीताच्या हावभावानुसार तिच्या घरात इडली, डोसासारखे दक्षिण भारतीय पदार्थ बनवले जातात.
तसेच लहानपणीच्या पुसट आठवणींद्वारे गीताने आपल्या गावाजवळ एक रेल्वे स्थानक आणि गावातील नदीच्या किनाऱ्यावर एक मंदिर असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार सुरुवातीला गीताला नांदेड, परभणी आणि जालना जिल्ह्यातील रेल्वे स्थानक असणाऱ्या परिसरात आणले. यानंतर तेलंगाणाच्या सीमाभागात गीताच्या कुटुंबाचा शोध घेतला आहे.
5 वर्षात गीता आमची असल्याचा 20 कुटुंबांचा दावा -
गेल्या पाच वर्षांत देशाच्या विविध भागातील सुमारे वीस कुटुंबांनी गीताला त्यांची हरवलेली मुलगी असल्याचे सांगितले होते. मात्र, यातील एकाही कुटूंबाचा गीतावर असलेला दावा तपासात सिद्ध होऊ शकलेला नाही.
काय आहे प्रकरण -
गीता सध्या ३० वर्षे वयाची असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ती बालपणी चुकीने रेल्वेगाडीत बसून सुमारे २० वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये गेली होती. पाकिस्तानी रेंजर्सला ती लाहोर रेल्वे स्थानकावर समझोता एक्स्प्रेसमध्ये बसलेली आढळली होती.
देशाच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांच्या विशेष प्रयत्नांमुळे ती 26 ऑक्टोबर 2015 रोजी भारतात परत आली होती. त्यानंतर ती इंदौरमधील स्वयंसेवी संस्थेत वास्तव्य करत आहे व आपल्या कुटुंबीयांचा शोध घेत देशाच्या विविध भागांत फिरत आहे.