नाशिक - कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड मिळणे ही मोठी समस्या ठरत आहे. त्यावर तोडगा म्हणून शिवसेना नगरसेवक अजय बोरस्ते यांच्या बालगणेश फाऊंडेशनने 'ऑक्सिजन बॅक' ही संकल्पना सुरू केली आहे. गरजू रुग्णांना घरापर्यंत ऑक्सिजन करेक्टर मशीन उपलब्ध करून दिली जात आहे. त्यामुळे रुग्णाची ऑक्सिजन बेडसाठी होणारी धावपळ कमी होत आहे. या संकल्पनेचे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी देखील कौतुक केले आहे. तसेच महापालिका स्तरावर हे माॅडेल राबविण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.
हवेतील ऑक्सिजन खेचून घेऊन त्याचा रुग्णाला पुरवठा-
कोरोना संसर्गचा उद्रेक झाला असून मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण असून ऑक्सिजन बेड मिळवणे अशक्यप्राय बाब ठरत आहे. त्यावर पर्यायी व्यवस्था म्हणून ऑक्सिजन बँक ही संकल्पना पुढे आली आहे. मुंबईमध्ये ऑक्सिजन बँक ही संकल्पना सुरू असून त्यानंतर नाशिकमध्ये हा प्रयोग राबविण्यात येत आहे. बोरस्ते यांनी २० मशीन मुंबई येथून मागवल्या असून त्याची किंमत प्रत्येकी दोन लाखांच्या घरात आहे. ही मशीन हवेतील ऑक्सिजन खेचून घेऊन त्याचा रुग्णाला पुरवठा करते. वाफेच्या मशिनसारखे हे ऑक्सिजन मशीन काम करते. रुग्ण फारच गंभीर स्थितीत असेल व त्यास ऑक्सिजनची गरज असेल तर हे मशीन जीवनदायनी ठरत आहे. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांची धावपळ कमी होऊन ऑक्सिजन बेडची पर्यायी व्यवस्था करण्यास त्यांना वेळ मिळतो. सध्या सर्व ऑक्सिजन मशीन बुक असून शंभर ते दीडशे वेटिंग आहे.
मशीन कसे बुक करु शकता?
बालगणेश फाऊंडेशनने दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क करून हे मशीन बुक करता येईल. अनेकजण गरज लागेल म्हणून विनाकारण अगोदरच मशीनसाठी बुकिंग करत आहेत. काहीजण मोफत असल्यामुळे स्वत: जवळच ठेवतात. हा सर्व प्रकार टाळण्यासाठी मशीनसाठी दिवसाला शंभर रुपये भाडे आकारले जात आहे. तसेच मशीनसाठी यापुढे डिपाॅझिटदेखील आकारले जाणार आहे.
आयुक्तांकडून माॅडेलचे कौतुक-
आयुक्त जाधव यांनी या ऑक्सिजन बँकेचे कौतुक केले असून शहरात हा पॅटर्न राबविण्याचा विचार करत आहेत. बोरस्ते यांनी त्यासाठी प्रत्येक नगरसेवकाला नगरसेवक निधीतून पाच लाख देण्याची मागणी केली आहे. जेणेकरून प्रत्येक नगरसेवक हे ऑक्सिजन मशीन खरेदी करुन त्यांच्या प्रभागात गरजू रुग्णांना ते उपलब्ध करून देऊ शकतात, असे बोरस्ते यांचे मत आहे.
आयुक्तांनी ऑक्सिजन बँकची घेतली दखल-
आयुक्तांनी ऑक्सिजन बँकेची दखल घेतली असून शहरात हा पॅटर्न राबिण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी हे मशीन उपयोगी ठरत आहे. ऑक्सिजन बेड नाही मिळाला तरी तीन ते चार दिवस हे मशीन वापरुन रुग्ण गरज भागवू शकतो. शहरातील नगरसेवक, रोटरी, लायन्स व विविध सामाजिक संस्थांनी ऑक्सिजन बँकेसाठी पुढाकार घेतल्यास नक्कीच आरोग्य व्यवस्थेवरील ताण हलका होईल, असे शिवसेनेचे नगरसेवक अजय बोरस्ते यानी सांगितले आहे.