नाशिक - मिशन महानगरपालिकेसाठी शहरात आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिकच्या कार्यकारिणीत मोठे फेरबदल केले आहेत. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे शहराध्यक्षपदी दिलीप दातीर यांची तर जिल्हाध्यक्षपदी अंकुश पवार आणि रतनकुमार इचम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिन भोसले यांना शहर समन्वयक पद बहाल करण्यात आले आहे. नूतन कार्यकारिणी जाहीर करताना राज ठाकरे यांनी नाशिक शहरातील सहाही विभाग अध्यक्षांना पदावर कायम ठेवला आहे.
मनसेचे नेते नाशकात
नाशिक महानगरपालिका निवडणूक तयारीच्या अनुषंगाने मनसेचे युवा नेते अमित ठाकरे, यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, किशोर शिंदे, अनिल शिदोरे, संदीप देशपांडे, संजय नाईक, अविनाश जाधव, अमेय खोपकर, राकेश पेडणेकर, योगेश परुळेकर, दिलीप कदम, योगेश खरे हे मुंबईचे वरिष्ठ नेते नाशिक शहरात दाखल झाले. या नेत्यांनी नाशिक येथील 'राजगडा'वर इच्छुकांच्या बैठका घेत शाखा अध्यक्षांच्या यादीला अंतिम स्वरूप दिले. राज ठाकरे यांचे नाशिक येथे आगमन झाल्यानंतर यादीला अंतिम मंजुरी घेत मनसे पदाधिकारी मेळाव्यात नुतन पदाधिकाऱ्यांसह 122 नवनियुक्त शाखाध्यक्षांची यादी जाहीर करण्यात आली.
२०१२ला नाशिक महानगरपालिकेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली सत्ता स्थापन केली होती. नवीन कार्यकारिणी आणि शाखाध्यक्ष मनसेला गतवैभव प्राप्त करुन देणार का, हे नजीकच्या काळात पाहायला मिळेल.