नाशिक - चांदवड-मनमाड आणि येवला तालुक्यातील काही भागात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचे आगमन झाले. यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तर, काही ठिकाणी गारांचा पाऊस देखील झाला.
मनमाड चांदवड येवला तालुक्यात परिसरात संध्याकाळच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाचे आगमन झाले. दुपारपासूनच वातावरणात उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली होती. पावसामुळे तापमान काही प्रमाणात खाली येणार असले तरीही येत्या काही दिवसात उन्हाची तीव्रता वाढून तापमान पुन्हा वाढणार आहे.
शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेला उन्हाळी कांदा, डाळींब आणि द्राक्ष या पिकांचे पावसामुळे काही प्रमाणात नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसाने चारा भिजू नये यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली. मात्र, या धावपळीत जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा भिजल्याने चाऱ्याचे नुकसान झाले आहे.