नाशिक - कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाल्यानंतर सध्या शाळांमधून ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी वेगवेगळे माध्यम वापरले जात असले तरी त्यात अनेक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परिणामकारकरित्या अध्ययन व अध्यापन करता यावे या हेतूने नाशिकच्या 'इस्पॅलियर स्कूल'ने अभिनव प्रयोग सुरू करत ऑनलाइन रेडिओ स्कूलची निर्मिती केली आहे.
ऑनलाइन शिक्षणाला पर्याय देत विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम कमी व्हावा आणि सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचावे, म्हणून तयार केलेल्याया रेडिओवरती 'प्री प्रायमरी' ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमाचे तब्बल अडीच हजार भाग (एपिसोड) रेकॉर्ड करून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 24 जूनपासून सुरू झालेल्या या रेडिओच्या माध्यमातून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी जीवन कौशल्याचे अभ्यासक्रम तसेच शालेय शिक्षणाचे धडे रेडिओवर ऐकलेले आहेत. एवढेच नव्हे तर कुटुंबातील पालक तसेच इतर सदस्यांनीही या रेडिओचा माध्यमातून सामान्य ज्ञानासह इतर माहिती जाणून घेतली आहे. ऑनलाइन रेडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देण्याचा प्रयोग करणारी 'इस्पॅलियर स्कूल' देशातील पहिली शाळा ठरली आहे.
कोरोनामुळे शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षणासाठी शाळेने स्कूल रेडिओची निर्मिती केली. शाळेतील इयत्ता आठवीच्या विद्यार्थी डिझाईन फॉर चेंज या प्रकल्प अंतर्गत (डीएफसी) दरवर्षी विविध नाविन्यपूर्ण प्रयोग करत असतात. या विद्यार्थ्यांच्या कल्पनेनुसार आता हा स्कूल रेडिओ आदिवासी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यासाठी शिक्षकांसोबत इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः विविध ऑडिओ क्लिप्स या आदिवासी बांधवांसाठी बनवल्या आहेत. राज्यात साधारण आठ लाख आदिवासी विद्यार्थी आहेत. त्यातील तीन ते चार लाख विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन आहेत. त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा रेडिओ उपलब्ध करून दिला जाणार आहे.
हेही वाचा - पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज चेन्नई ते पोर्ट ब्लेअर सबमरीन ऑप्टिकल फायबर केबल लिंकचे उद्घाटन
असा आहे स्कूल रेडिओ -
रेडिओद्वारे मिळणार शिक्षणाची संधी... स्कूल रेडिओमध्ये 'प्री प्रायमरी' ते दहावीच्या अभ्यासक्रमांचा समावेश असून यात विविध 88 प्रोग्राम अंतर्गत अडीच हजार ऑडिओ रेकॉर्ड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पाच-पाच मिनिटांपासून ते दहा मिनिटांचे एकूण अडीच हजार एपिसोड आतापर्यंत रेकॉर्ड करण्यात आले आहेत. तसेच या रेडिओमध्ये परमवीर चक्र मिळालेले सर्व भारतीय सैनिकांच्या गोष्टी आहेत. महाराष्ट्रातील किल्ल्यांबद्दल माहिती आहे. विविध कविता आहेत. ज्यामध्ये मंगेश पाडगावकर, कुसुमाग्रज, कवी भूषण यांनी शिवाजी महाराजांवर केलेल्या कवितांचाही समावेश आहे. स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी त्यांचे विचार ऐकण्याची संधी यात मिळेल. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्व स्वातंत्र्य सैनिकांची माहिती यात आहे, साने गुरुजींच्या गोष्टी यात आहेत. महात्मा गांधीजींचे आत्मचरित्र आहे. गणिताचे पाढे, गणिताचे विविध सूत्रे ते कसे लक्षात ठेवायचे त्याचे तंत्र, मराठी म्हणी, इंग्लिशच्या कविता, शास्त्रज्ञांची माहिती, भारतीय राज्यघटना, अंधश्रद्धा निर्मूलन, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, मुलांसाठी गोष्टी उदा. पंचतंत्राच्या गोष्टी, अकबर बिरबलाच्या गोष्टी, प्रथम प्रकाशनाच्या गोष्टी, सामान्य ज्ञान, श्रुती पानसे यांच्या आधुनिक स्फूर्तिकथा, विविध मान्यवरांची भाषणे उदा. यजुर्वेद महाजन, श्याम मानव, रमेश पानसे. मुख्य म्हणजे पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाबरोबरच सामान्य ज्ञान आणि जीवन कौशल्याची माहिती याद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ऑनलाइन रेडिओचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला फक्त आधी रेकॉर्ड केलेल्या क्लिप्स ऐकवता येतील असे नही, तर 'लाईव्ह रिअल टाइम'मध्ये सुद्धा रेडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत आपला आवाज पोचवता येणार. त्यामुळे यावर विविध मान्यवरांचे लाईव्ह भाषणसुद्धा आयोजित करता येतात. आतापर्यंत मा. पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील, मा. जिल्हाधिकारी सुरेश मांढरे, जागतिक विचारवंत संदीप वासलेकर, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ रमेश पानसे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे.
स्कूल रेडिओ विद्यार्थ्यांसह सर्वांनाच फायदेशीर -लॉकडॉऊनमध्ये एप्रिल आणि मे या दोन महिन्यात सर्व शिक्षकांना रेडीओसाठी कसे व्हॉइस रेकॉर्ड करायचे याचे प्रशिक्षण दिले. रेकॉर्डिंग स्टुडिओ तसेच घरून मोबाईलवरून ऑडियो क्लिप्स बनवल्या. रेडिओचा प्रयोग यशस्वी झाल्याने आता आदिवासी विद्यार्थ्यांना हा स्कूल रेडिओ उपलब्ध करून दिला जाणार आहे. महाराष्ट्रातील सर्व आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत आदिवासी विकास महामंडळातर्फे स्कुल रेडिओ पोहोचविण्यात येत आहे. अशी माहिती सचिन जोशी, इस्पॅलियर स्कूल यांनी दिली आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत स्कूल रेडिओ पोहचवणार -शाळा बंद असल्याने आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून इस्पॅलियर स्कूल ने तयार केलेला स्कूल रेडिओ महाराष्ट्रातील सर्व आदिवासी विद्यार्थ्यांनापर्यंत पोहोचविला जाईल, ग्रामपंचायत, शिक्षक व विद्यार्थ्यांना हा स्कूल रेडिओ उपलब्ध होणार आहे. तसेच आदिवासी विभागाच्या एकलव्यच्या शाळांमध्येही हा रेडिओ उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती आदिवासी विकास विभागाचे आयुक्त किरण कुलकर्णी यांनी दिली आहे.
हेही वाचा - राज्यातील 'पाणी व स्वच्छता मिशन'मधील तीन हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार